गेल्या काही दिवसांपासून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा चांगल्याच चर्चेत आहेत. लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी त्यांनी लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपानंतर संसदेच्या नैतिकता समितीने त्यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस केली. दरम्यान, या सर्व घडामोडी घडत असताना तृणमूल काँग्रेस किंवा तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. याच कारणामुळे महुआ मोईत्रा एकाकी पडल्या आहेत, असा दावा केला जात होता. मात्र, आता ममता बॅनर्जी यांनी पहिल्यांदाच या प्रकरणावर भाष्य केले असून मोईत्रा यांची पाठराखण केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ममता बॅनर्जी काय म्हणाल्या?

ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी (२३ नोव्हेंबर) महुआ मोईत्रा यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर भाष्य केले. “मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तशी योजना आखण्यात आली आहे. मात्र, यामुळे मोईत्रा यांना आगामी निवडणुकीसाठी फायदाच होणार आहे”, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. त्या कोलकाता येथे एका कार्यक्रमात बोलत होत्या.

ममता बॅनर्जी यांनी सर्व आरोप फेटाळले

महुआ मोईत्रा यांच्यावर लाच घेतल्याचे आरोप झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी तसे आरोप केले होते. हे आरोप करताना त्यांनी लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. दुसरीकडे मात्र मोईत्रा यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.

ममता बॅनर्जी यांनी केली पाठराखण

तृणमूल काँग्रेसने या प्रकरणात याआधी कोणतीही प्रतिक्रिया न दिल्यामुळे नेमके भाजपाला आणखी बळ मिळाले होते. मोईत्रा यांनी लाच घेतलेली आहे. म्हणूनच तृणमूल काँग्रेस त्यांची पाठराखण करत नाहीये, असा तर्क भाजपाच्या नेत्यांकडून लावला जात होता. आता मात्र खुद्द ममता बॅनर्जी यांनीच मोईत्रा यांची बाजू घेतली आहे. त्यामुळे मोईत्रा यांच्या पाठिशी संपूर्ण पक्ष आहे, असा संदेश गेला आहे.

अभिषेक बॅनर्जी यांनी केली होती पाठराखण

एकीकडे लाच घेतल्याचे आरोप होत असताना काही दिवसांपूर्वीच तृणमूल काँग्रेसने महुआ मोईत्रा यांच्यावर कृष्णानगर जिल्ह्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. काही दिवसांपूर्वीच हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर मोईत्रा यांनी ममता बॅनर्जी तसेच तृणमूल काँग्रेसचे आभार मानले होते. तर ही जबाबदारी सोपवण्याआधी तृणमूल काँग्रेसचे क्रमांक दोनचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी मोईत्रा यांची पाठराखण केली होती. “महुआ मोईत्रा यांच्यावरील आरोपांची चौकशी केली पाहिजे, अशी भूमिका केंद्र सरकार तसेच लोकसभेच्या नैतिकता समितीने घेतली आहे. मोईत्रा यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नसताना तसेच चौकशी करण्याची गरज व्यक्त केलेली असताना त्यांच्यावर निलंबनाची कारवाई का केली जात आहे? मला वाटते, महुआ मोईत्रा एकट्याने लढू शकतात,” असे अभिषेक बॅनर्जी म्हणाले होते.

मोईत्रा यांच्यावर नेमका आरोप काय?

दरम्यान, मोईत्रा यांचे तत्कालीन घनिष्ठ मित्र व सर्वोच्च न्यायालयातील वकील जय आनंद देहदराई यांनी पुरावे दिल्याचा दावा दुबे यांनी केला होता. मोईत्रा यांनी हिरानंदानी यांना संसदेकडून दिला जाणारा लॉग-इन आयडी व पासवर्ड दिला होता. त्यावरून हिरानंदानी यांनी अदानी समूहासंदर्भात प्रश्न विचारले होते. त्याबदल्यात मोईत्रा यांनी लाच घेतल्याचा आरोप दुबेंनी लोकसभाध्यक्षांना पत्र लिहून केला होता. या पत्राच्या आधारे लोकसभाध्यक्षांनी हे प्रकरण नैतिकता समितीकडे सोपविले होते. समितीसमोर २७ ऑक्टोबर व २ नोव्हेंबर अशी दोनवेळा सुनावणी झाली. दुबे यांचा आरोप, हिरानंदानी यांचे प्रतिज्ञापत्र व देहदराई यांचा जबाब यावरून समितीने अहवाल तयार केला. तसेच मोईत्रा यांच्या निलंबनाची शिफारस करण्यात आली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tmc leader mamata banerjee comment on cash for query allegation on mahua moitra prd