पुणे : राज्यातील विविध बारा उत्पादनांना भौगोलिक मानांकन (जीआय) प्रमाणपत्रे मिळाली आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या भौगोलिक संकेत विभागाने हे मानांकन जाहीर केले आहे.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या भौगोलिक संकेत विभागाने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, पानचिंचोली चिंच (लातूर), भोरसरी डाळ (लातूर), काष्टी कोथिंबीर (लातूर), दगडी ज्वारी (जालना), कुंतलगिरी खवा (धाराशिव), बहाडोली जांभूळ आणि बदलापूर जांभूळ (पालघर), वसमत हळद (हिंगोली), नंदूरबार मिरची आणि नंदुरबार आमचूर (नंदूरबार) या दहा कृषी उत्पादनांसह पेनचे गणपती (रायगड), कवडी माळ तुळजापूर (धाराशिव), या हस्तकला उत्पादनांना भौगोलिक मानांकन जाहीर झाले आहे.

हेही वाचा >>> पुढील दोन महिन्यांसाठी हवामानाचा अंदाज काय? हवामान विभागाने दिली माहिती…

जीआयची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होऊन जीआयच्या संशोधन पत्रिकेत २९ नोव्हेंबर २०२३ रोजी वरील सर्व बारा उत्पादनांची प्राथमिक पातळीवर नोंदणी झाली होती. त्यानंतर चार महिन्यांचा कालावधी तक्रारी किंवा आक्षेप घेण्यासाठी राखीव ठेवला जातो. हा कालावधी ३० मार्च रोजी संपल्यानंतर संबंधित उत्पादनांना अधिकृत जीआय प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे.

शेती उत्पादने, प्रक्रिया उत्पादनांसह हस्तकलेचा सन्मान झाला आहे. पानचिंचोली चिंच, काष्टी कोथिंबीर, दगडी ज्वारी, बहाडोली जांभूळ आणि बदलापूर जांभूळ, वसमत हळद, नंदूरबार मिरची आणि नंदूरबार आमचूर, ही कृषी उत्पादने आहेत. भोरसरी डाळ, कुंतलगिरी खवा हे प्रक्रियायुक्त पदार्थ आहेत आणि पेनचे गणपती आणि कवडी माळ, ही हस्तकला उत्पादने आहेत.

हेही वाचा >>> पुणे : शहरात अघोषित पाणीकपात? पेठांचा भागवगळता उर्वरित शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जीआय चळवळ निती आयोगाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्या प्रेरणेने पुण्यातील ॲड. गणेश हिंगमिरे यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ उत्पादनांची जीआय मानांकन मिळण्यासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ५१ उत्पादनांना जीआय प्रमाणपत्र मिळाले आहे, नऊ उत्पादनांना एप्रिलअखेर मानांकन मिळण्याची शक्यता आहे. ३१ मार्चच्या अधिसूचनेत राज्यातील एकूण बारा उत्पादनांना मानांकन मिळाले आहेत, त्यापैकी नऊ उत्पादनांची नोंदणी प्रक्रिया हिंगमिरे यांनी पार पाडली आहे. हिंगमिरे यांच्या प्रयत्नांनी बोडोलॅण्डमधील आदिवासी उत्पादनांनाही जीआय मानांकन मिळाले आहे.