पिंपरी: चिंचवड स्टेशनजवळील आनंदनगरमध्ये महावितरणने बुधवारी व गुरुवारी दोनदिवस धडक मोहीम राबवून सुमारे १४०० घरगुती वीजचोऱ्या उघडकीस आणल्या आहेत. थेट तारांवर टाकलेले आकडेही जप्त करण्यात आले. या परिसरात वीजचोऱ्या होऊ नये यासाठी येत्या १५ दिवसांमध्ये एरियल बंच केबल लावण्यात येणार आहे. कारवाईनंतर नवीन घरगुती वीजजोडणी घेण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांची रिघ लागली आहे.
भोसरी विभागातील चिंचवड शाखेअंतर्गत आनंदनगर हा परिसर येतो. या ठिकाणी ३१५ केव्हीए क्षमतेचे रोहित्र नादुरुस्त झाले होते. त्याची पाहणी करताना आकडे टाकून वीजचोऱ्या होत असल्याने अतिभारित झालेले रोहित्र नादुरुस्त झाल्याचे आढळून आले होते. महावितरणकडून लगेचच कारवाई करीत सर्व आकडे काढून टाकण्यात आले. त्यानंतर दहा दिवसांपूर्वी आनंदनगरमध्ये नवीन रोहित्र बसविण्यात आले, ते दोन दिवसांनी पुन्हा नादुरुस्त झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चिंचवड शाखेच्या सहायक अभियंता कृतिका भोसले तसेच आकुर्डी उपविभाग कार्यालयाचे सहायक अभियंता शीतल किनकर व अमित पाटील यांच्यासह १५ जनमित्रांनी बुधवारी (दि. १५) सकाळी दहा वाजता आनंदनगरमध्ये वीजचोरीविरोधी पुन्हा विशेष मोहीम सुरू केली. त्यास विरोध करणाऱ्या नागरिकांना वीजचोरीचे परिणाम समजून सांगण्यात आले व अधिकृत वीजजोडणी घेण्याचे आवाहन करण्यात आले.

गुरुवारी (दि. १६) या मोहिमेला सकाळी ११ च्या सुमारास विरोध वाढल्यामुळे पोलिसांचे सहकार्य घेण्यात आले. या दोन दिवसीय कारवाईमध्ये थेट आकडे टाकून तसेच इतर मार्गाने सुरू असलेल्या सुमारे १४०० घरगुती वीजचोऱ्या उघड करण्यात आल्या व वीजचोरीसाठी वापरलेले सर्व साहित्य जप्त करण्यात आले. मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी आनंदनगर परिसरात पुन्हा वीजचोऱ्या होऊ नयेत यासाठी एरियल बंच केबलचा वापर करण्याची सूचना दिली. त्याचा आराखडा त्वरित तयार करण्याचे निर्देश दिले आहे. येत्या १५ दिवसांत एरियल बंच केबल लावण्यात येणार आहे.

दरम्यान, या मोहिमे दरम्यान महावितरणकडून वीजमीटर काढून कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही वीजचोरी होत असल्याचे दिसून आले. तसेच काहींनी थेट आकडे टाकून वीजचोरी केल्याचे आढळून आले. या सर्वांना अधिकृत नवीन घरगुती वीजजोडणी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नवीन वीजजोडणी घेण्यासाठी आतापर्यंत थकबाकीपोटी सुमारे ६० हजार रुपयांचा भरणा करण्यात आला आहे. तसेच नवीन वीजजोडणीची मागणीही वाढली असल्याचे महावितरण कडून सांगण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1400 power thefts of mahavitran in chinchwad pune print news ggy 03 amy