पुणे : गुंतवणुकीवर जादा परताव्याच्या आमिषाने १०० कोटी रुपयांंची फसवणूक करणाऱ्या पुण्यातील व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीची २४ कोटी ४१ लाख रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली. या कंपनीचा संचालक विनोद खुटे दुबईत पसार झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत ईडीचे सहायक संचालक रत्नेशकुमार कर्ण (वय ४३) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ‘व्हीआयपीएस’ कंपनीचे संचालक विनोद तुकाराम खुटे, संतोष तुकाराम खुटे, मंगेश खुटे (तिघे रा. निर्माण व्हिवा सोसायटी, सिंहगड महाविद्यालयाजवळ, आंबेगाव बुद्रुक), किरण पितांबर अनारसे, अजिंक्य बडघे यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून व्हीआयपीएस कंपनीचा संचालक विनोद खुटे आणि साथीदारांनी फसवणूक केली होती. आंबेगाव बुद्रुक परिसरातील कार्यालयाला खुटे टाळे लावून पसार झाला. गुंतवणूकदारांना परतावा दिला नसल्याने शेकडो गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. तपासात खुटे आणि साथीदारांनी १०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले.

हेही वाचा >>>आश्वासन वर्षाला दोन कोटी रोजगारांचे, प्रत्यक्षात नऊ वर्षांत सात लाखच नोकऱ्या; सरकारला जाब विचारण्याचे शरद पवार यांचे तरुणाईला आवाहन

ईडीकडून याप्रकरणात तपास करण्यात येत होता. गेल्या वर्षी जून महिन्यात ईडीने पुणे, मुंबई, तसेच अहमदाबादमधील व्हीआयपीएस कंपनी आणि ग्लोबल ॲफिलेट बिझनेस या वित्तीय संस्थांवर कारवाई केली होती. ईडीच्या मुंबई विभागीय कार्यालयाने ही कारवाई केली होती. पीएमएलए (प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट) कायद्यान्वये कारवाई केली होती. विनोद खुटेच्या कुटुंबीयांच्या नावे असलेली आठ कोटी ९८ लाख रुपयांची मालमत्ता, व्हीआयपीएस आणि ग्लोबल ॲफिलेट बिझनेस कंपनीच्या नावावर असलेल्या पाच सदनिका, दोन मालमत्ता, दोन कार्यालये आणि नगर येथील दोन हेक्टर जमीन जप्त करण्यात आली होती.

आतापर्यंत ७० कोटींची मालमत्ता जप्त

फसवणूक प्रकरणाचा मुख्य सूत्रधार विनोद खुटे दुबईत पसार झाला आहे. त्याने वेगवेगळ्या नावे दोन वित्तीय संस्था सुरू करून गुंतवणूकदारांची १०० कोटी रुपयांहून जास्त रकमेची फसवणूक केली होती. हवालाच्या माध्यमातून त्याने ही रक्कम परदेशात पाठविल्याचे तपासात उघडकीस आले होते. यापूर्वी ईडीने खुटे आणि त्यांच्या कंपनीच्या नावावर असलेली ३७ कोटी ५० लाखांची मालमत्ता जप्त केली होती. त्यानंतर ईडीने शनिवारी कारवाई करून २४ कोटी ४१ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली असून, आतापर्यंत ७० कोटी ८९ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

फसवणूक प्रकरण नेमके काय?

व्हीआयपीएस कंपनी आणि ग्लोबल ॲफिलेट बिझनेस कंपनीने गुंतवणूकदारांना गुंतवणुकीवर आकर्षक व्याजदराचे आमिष दाखविले होते. विनोद खुटेने परदेशी मुद्रा विनिमय व्यवहार (फाॅरेक्स) ट्रेडिंग कंपनी सुरू केली होती. गुंतवणूकदारांकडून आलेले पैसे त्याने कान्हा कॅपिटल कंपनीत वळविले होते. गुंतवणूकदारांशी तो ऑनलाइन बैठकांच्या माध्यमातून संवाद साधत होता. त्याने गुंतवणूकदारांकडून आलेले पैसे बनावट कंपनीच्या नावाने उघडलेल्या खात्यात वळविले होते. त्याने जवळपास १०० कोटी रुपयांची रक्कम हवालामार्गे परदेशात पाठविली होती.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 24 crore property of vips company from ed pune print news rbk 25 amy