पिंपरी : गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजारामुळे पिंपळेगुरव परिसरातील एका ३६ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ‘जीबीएस’नंतर या रुग्णाला न्यूमोनियाचीही लागण झाली होती.पिंपळेगुरव परिसरात वास्तव्यास असलेल्या ३६ वर्षीय युवकाला २१ जानेवारी रोजी गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजाराची लागण झाली होती. या रुग्णावर महापालिकेच्या संत तुकाराम नगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू होते. या रूग्णाला गुईलेन बॅरे सिंड्रोम नंतर न्यूमोनियाचीही लागण झाली होती. उपचारादरम्यान ३० जानेवारी रोजी या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. युवकाचा मृत्यू नेमका कोणत्या आजारामुळे झाला, उपचारात हयगय झाली का, याची चौकशी करण्यासाठी वायसीएमने समिती स्थापन केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुईलेन बॅरे सिंड्रोमनंतर या रुग्णाला न्यूमोनियाही झाला होता. न्यूमोनियामुळे श्वसनसंस्थेवर आघात झाला. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास झाल्याने आणि गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजाराने मृत्यू झाल्याची कारणे समितीने दिली आहेत. दरम्यान, २५ जानेवारी रोजी गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराची लागण झालेल्या पिंपरीतील एका ६७ वर्षीय महिलेचा न्यूमोनिया, श्वसनक्रिया बंद पडणे, रक्तात संसर्ग पसरल्याने मृत्यू झाला होता. या महिलेवर अडीच महिन्यांपासून उपचार सुरू होते. ‘जीबीएस’मुळे मृत्यू झाला नसल्याचा दावा वैद्यकीय विभागाने केला होता. शहरात आजपर्यंत १३ रुग्ण गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजाराचे आढळले होते. त्यापैकी काही रुग्ण बरे झाले आहेत. तर, काहींवर उपचार सुरू आहेत.

हेल्पलाईन सुरू

गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजाराची योग्य माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी, नागरिकांच्या शंकेचे निरसन व्हावे यासाठी महापालिकेने हेल्पलाईन सुरू केली आहे. हेल्पलाईन २४ तास सुरू आहे. तज्ञ वैद्यकीय अधिकारी २४ तास उपलब्ध असतील. या आजाराबाबत चौकशी करण्याकरिता नागरिकांनी ७७५८९३३०१७ या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 36 year old man from pimplegurav died due to gbs complications and pneumonia pune print news ggy 03 sud 02