पुणे : महाराष्ट्र परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) यंदा सुमारे ४ लाख ७५ हजार उमेदवारांनी नोंदणी केली असून, गेल्या वर्षी झालेल्या टीईटीच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टीईटीसाठीचे अर्ज सुमारे एक लाखाने वाढले आहेत.
सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व मंडळांच्या, सर्व माध्यमांच्या अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवी या इयत्तांच्या शिक्षणसेवक, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. राज्यात राज्य परीक्षा परिषदेमार्फत टीईटी परीक्षा आयोजित करण्यात येते. परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २३ नोव्हेंबर रोजी टीईटी परीक्षा राज्यभरात आयोजित केली जाणार आहे. त्यात पहिली ते पाचवी या इयत्तांसाठीचा पेपर-एक सकाळच्या सत्रात, तर सहावी ते आठवी या इयत्तांसाठीचा पेपर-दोन दुपारच्या सत्रात होणार आहे.
या परीक्षेच्या नोंदणीसाठी १५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, राज्यातील अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे काही उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरण्यात अडचणी आल्याने परीक्षा परिषदेने अर्ज भरण्यासाठी ९ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानुसार या मुदतीत सुमारे ४ लाख ७५ हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे.
परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे म्हणाले, ‘गेल्या वर्षी झालेल्या टीईटीसाठी सुमारे ३ लाख ५८ हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. तर, २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या टीईटीसाठी सुमारे ४ लाख ७५ हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी झालेल्या टीईटी परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी बायोमेट्रिक, फेस रेकग्निशन, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सीसीटीव्ही कॅमेरे अशा उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्याचा उत्तम परिणाम दिसून आला. त्यामुळे आगामी टीईटीसाठीही या उपाययोजनांचा वापर केला जाणार आहे.’
नोंदणीमध्ये वाढ का?
शिक्षक सेवेत येऊ इच्छिणाऱ्या नव्या उमेदवारांसह सेवेत कार्यरत राहू इच्छिणारे शिक्षक, पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण अनिवार्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिला. त्यानंतर राज्य परीक्षा परिषदेने समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) पदासाठी जाहीर केलेल्या विभागीय परीक्षेच्या पात्रतेमध्येही टीईटी उत्तीर्ण असण्याची तरतूद नमूद केली आहे. या पार्श्वभूमीवर, टीईटीची पात्रता प्राप्त करण्याच्या दृष्टीने नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टीईटीसाठी नव्या उमेदवारांसह कार्यरत शिक्षकांनीही नोंदणी केली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे टीईटीच्या नोंदणीत वाढ झालेली असू शकते, असे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.