महिनाभरात ४०३ तक्रारी दाखल; स्वतंत्र कक्ष उभारल्याने दिलासा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे पोलीस आयुक्तालयात ज्येष्ठ नागरिक कक्षाचे कामकाज नवीन वास्तूत सुरु झाल्यानंतर ज्येष्ठांकडून करण्यात येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. या कक्षात महिनाभरात ज्येष्ठ नागरिकांकडून तब्बल चारशे तीन तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. ज्येष्ठांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी स्वतंत्र कक्ष तसेच पोलिसांची नेमणूक करण्यात आल्यामुळे पोलीस आयुक्तालयात तक्रारी घेऊन येणाऱ्या ज्येष्ठांना दिलासा मिळाला आहे.

पोलीस आयुक्तालयात ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाचे कामकाज पूर्वी गुन्हे शाखेच्या साामाजिक सुरक्षा विभागात चालत होते. त्यामुळे पोलीस आयुक्तालयात तक्रार  घेऊन येणाऱ्या ज्येष्ठांची कुंचबणा होत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक कक्षासाठी स्वतंत्र वास्तू बांधण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी घेतला. पोलीस आयुक्तालयाच्या आवारात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र वास्तू बांधण्यात आली. गेल्या महिन्यात २५ एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरिक कक्षाचे कामकाज नवीन वास्तूत सुरु झाले. नवीन वास्तूच्या बांधकामासाठी अथश्री फाउंडेशनकडून सहकार्य करण्यात आले आहे, अशी माहिती ज्येष्ठ नागरिक कक्षाचे कामकाज सांभाळणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

ज्येष्ठ नागरिक कक्षाचे कामकाज नवीन वास्तूत सुरु झाल्यानंतर तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. महिन्याभरात ज्येष्ठ नागरिकांकडून चारशेतीन तक्रारी दाखल झाल्या आहेत. दररोज किमान चार ते पाच तक्रारी दाखल होत आहेत.

ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी महिला पोलिसांची नेमणूक करण्यात आली असून ज्येष्ठांना बसण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे ज्येष्ठांच्या तक्रारी स्वीकारण्याचे काम सुलभ झाले आहे. पुणे पोलिसांकडून शहरातील पाच हजार ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना पोलिसांकडून ओळखपत्र देण्याचे काम सुरु झाले आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी पोलिसांकडून हेल्पलाईन सुरु करण्यात आली असून हेल्पलाईन क्रमांक ‘१०९०’ असा आहे.

मुलांकडून त्रास, ध्वनिवर्धकाचा आवाज..

पुणे शहरात एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. अनेकांची मुले नोकरी-व्यवसायानिमित्त परदेशात किंवा अन्य शहरात राहायला आहेत. ज्येष्ठांच्या तक्रारी प्राधान्याने सोडवण्यात याव्यात, अशा सूचना पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक कक्षात ज्येष्ठांकडून करण्यात येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण वाढत आहे. मुलांकडून त्रास होणे, संपत्तीसाठी देण्यात येणारा त्रास, सांभाळ न करणे, शेजाऱ्यांचा त्रास, ध्वनिवर्धकाचा आवाज तसेच सोसायटीच्या आवारातील आरडाओरडा अशा स्वरुपाच्या तक्रारी घेऊन ज्येष्ठ नागरिक पोलीस आयुक्तालयात येतात. त्यांच्या समस्या आणि तक्रारी सोडवण्यासाठी पोलिसांकडून तातडीने प्रयत्न करण्यात येतात. ज्येष्ठांच्या तक्रारी नजीकच्या पोलीस ठाण्यांपर्यंत पोहोचवण्यात येतात. त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींची संख्या

जानेवारी                               १६७

फेब्रुवारी                                १३१

मार्च                                     १३३

२५ एप्रिल      ते २५ मे          ४०३

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 403 complaints in a months registered in senior citizen cell