सत्ता आल्यास विजेत ५० टक्के सवलत देण्याची घोषणा महायुतीचे नेते करत असले तरी प्रत्यक्षात ते शक्यच होणार नाही. आम्ही २० टक्के सवलत देऊ केली तरी ८ हजार ४०० कोटींचा बोजा सरकारवर पडला. हेच सवलतींचे प्रमाण ५० टक्क्य़ांपर्यंत वाढवल्यास किती कोटींचा तोटा होईल, याचा विचार करूनच त्यांनी घोषणा कराव्यात, जनतेची दिशाभूल करू नये, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भोसरीत स्पष्ट केले. जात, धर्म, भाषा अशा भावनांशी खेळण्याचे घाणेरडे राजकारण अन्य पक्ष करतात, राष्ट्रवादीने नेहमीच विकासाचे राजकारण केले आहे, असेही ते म्हणाले.
पिंपरी पालिकेच्या वतीने व आमदार विलास लांडे यांच्या पुढाकाराने लांडेवाडी चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवसृष्टीचे उद्घाटन अजितदादांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. महापौर मोहिनी लांडे, आमदार लक्ष्मण जगताप, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, उपमहापौर राजू मिसाळ, स्थायी समितीचे अध्यक्ष नवनाथ जगताप, पक्षनेत्या मंगला कदम, आयुक्त राजीव जाधव आदी उपस्थित होते. िपपरी पालिका व प्राधिकरणाच्या वतीने होत असलेल्या विकासकामांचा आढावा पवार यांनी आपल्या भाषणात घेतला.
पवार म्हणाले,‘‘विरोधक बिनबुडाचे आरोप करतात, आम्ही विकास करतो, बोलतो ते कृतीतून दाखवतो. विकासाच्या कामात राजकारण आणत नाही. मुंबईत उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकासाठी १०० कोटी तरतूद करण्यात आली आहे. हे काम पूर्ण होण्यास तीन वर्षांचा कालावधी लागेल. स्मारक उभारण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरते आहे. पवनेचे पाणी भविष्यात कमी पडणार असल्याचे लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवडसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत असून पवनेशिवाय अन्य दोन धरणातून ९७ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित करण्यात आले आहे. पुण्यातील मेट्रो तसेच मोशीतील प्रकल्प लवकरच मार्गी लागेल. नवे आयुक्त राजीव जाधव चांगले आयुक्त असून डॉ. श्रीकर परदेशी यांचेही काम चांगले होते, अशी टिप्पणी त्यांनी केली. प्रास्ताविक विलास लांडे यांनी केले. अण्णा बोदडे यांनी सूत्रसंचालन केले. जितेंद्र ननावरे यांनी आभार मानले.
 
लांडे यांचे ‘साधे लग्न, मोजकी माणसे’!
आमदार विलास लांडे यांच्या मुलाच्या लग्नात लाखाहून अधिक उपस्थिती होती, मोठा डामडौल होता, त्याचा संदर्भ देत लांडे यांची फिरकी घेण्याचा मोह अजितदादांना याही वेळी आवरला नाही. विलासच्या मुलाचे लग्न खूपच साधेपणाने झाले, लोकंही मोजकीच होती, खर्चही माफकच झाला. लक्ष्मण जगतापने पोरीचे लग्न जोरात केले म्हणून विलासनेही पोराच्या लग्नात कसूर ठेवली नाही. आता यांची साधेपणाची लग्ने पाहून माझ्या दोन मुलांच्या लग्नांचे कसे करायचे, असा प्रश्न आताच पडला आहे, अशी कोटी त्यांनी केली.