पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात कोसळत असलेला संततधार पाऊस बुधवारी देखील कायम होता. त्यामुळे पुणे शहराला एक महिना पुरेल एवढा पाणीसाठा गेल्या दोन दिवसांच्या पावसाने धरणांमध्ये जमा झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चालू आठवडाअखेर घाटमाथ्यावर मुसळधारांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. असाच पाऊस कायम राहिल्यास लवकरच धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा होऊ शकणार आहे.

शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. सध्या या चारही धरणांमध्ये ४.०८ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच १४.०१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी ६ जुलैपर्यंत चारही धरणांमध्ये ८.६७ टीएमसी म्हणजेच २९.७६ टक्के पाणीसाठा जमा झाला होता. सध्या गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणांमध्ये ४.५९ टीएमसीने पाणीसाठा कमी आहे. मोसमी पाऊस सक्रिय झाल्यापासून संपूर्ण जून महिन्यात या चार धरणांच्या परिसरात जोरदार पाऊस झालेला नाही. मात्र, जुलैच्या सुरुवातीपासूनच हलक्या स्वरूपाचा पाऊस धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असून तीन-चार दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस हजेरी लावत आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत चारही धरणांमध्ये ३.३५ टीएमसी म्हणजेच ११.५० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत चारही धरणांमध्ये ४.०८ टीएमसी म्हणजेच १४.०१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मंगळवारी सायंकाळच्या तुलनेत बुधवारी सायंकाळी ०.७३ टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे, तर सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सायंकाळी ०.६१ टीएमसीने पाणीसाठा वाढला होता. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत १.३४ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. पुणे शहराला दरमहा एक ते सव्वा टीएमसी पाण्याची गरज भासते. परिणामी दोन दिवसांत शहराला महिनाभर पुरेल एवढा पाणीसाठा धरणांमध्ये जमा झाल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सकाळपर्यंत टेमघर धरण परिसरात ६५ मिलिमीटर, वरसगाव धरणाच्या क्षेत्रात ७० मि.मी. पानशेत धरण परिसरात ६८ मि.मी., तर खडकवासला धरण परिसरात १८ मि.मी. पावसाची नोंद झाली. तर, बुधवारी दिवसभरात टेमघर धरणक्षेत्रात ३० मि.मी., वरसगाव आणि पानशेत धरण परिसरात अनुक्रमे ५३ आणि ५२ मि.मी., तर खडकवासला धरणक्षेत्रात ११ मि.मी. पाऊस पडला, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा टीएमसी, टक्क्यांमध्ये

टेमघर ०.१४ ३.७५

वरसगाव १.४७ ११.४३

पानशेत १.७४ १६.३७

खडकवासला ०.७३ ३७.१५

एकूण ४.०८ १४.०१

जिल्ह्यातील इतर धरणांमध्येही पावसाची दमदार हजेरी

पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणक्षेत्रात दिवसभरात ९८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. सध्या या धरणात १.४३ टीएमसी म्हणजेच १६.८४ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. याशिवाय वडीवळे, आंद्रा, मुळशी, गुंजवणी, निरा देवघर आणि भाटघर अशा इतर धरणांमध्येही दमदार पाऊस हजेरी लावत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accumulation of water in dams for a month in two days amy
First published on: 06-07-2022 at 21:58 IST