मुरुड येथील समुद्रकिनाऱ्यावर सहलीसाठी गेलेल्या चौदा विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्यानंतर या दुर्घटनेस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरुन महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या संचालकांसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अशा सतरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या दुर्घटनेत बळी पडलेली वीस वर्षीय विद्यार्थिनी स्वप्नाली सलगर हिचे वडील शिवाजी महादेव सलगर यांनी यासंदर्भात मुरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे ( आझम कॅम्पस) संचालक पीरपाशा इनामदार,अबेदा इनामदार, लतीफ मगदूम, इरफान शेख, मुजफ्फर शेख, सहलीच्या संयोजक प्रा. शैला बुटवाला, शिक्षक शकीलाबानू अब्दुलवहाब सिद्धवटम, आल्फीया जहागीरदार,  जस्मीन अत्तार, समृद्धी सावंत, कवीता अग्रवाल, सुमय्या शेख, अर्चना बनसोडे, नमीता मराठे, शिक्षकेतर कर्मचारी रफीक बांगी, हुसेन शेख, अरीफ शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर परिसरात महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे आझम कॅम्पस शैक्षणिक संकुल आहे. सन एक फेब्रुवारी  २०१६ रोजी मुरुड येथे आझम कॅम्पसमधील  संगणक शास्त्र विभागात शिकणारे एकशे बारा विद्यार्थी सहलीसाठी गेले होते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास समुद्र किनाऱ्यावर खेळणारे विद्यार्थी पाण्यात उतरले. मोठय़ा लाटेच्या तडाख्यात चौदा विद्यार्थी पाण्यात बुडाले. यामध्ये विद्यार्थिनींचा समावेश होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर शोकाकुल पालकांनी आझम कॅम्पसमध्ये धाव घेतली. या दुर्घटनेस संस्थाचालक, शिक्षक जबाबदार असल्याचा आरोप पालकांनी केला होता.
संचालक आणि शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान पालक शिवाजी सलगर यांनी मुरुड पोलिसांकडे तक्रार दिली. समुद्र किनाऱ्यावर सहल काढणे धोकादायक आहे, याची जाणीव संस्थाचालक आणि शिक्षकांना असताना त्यांनी सहल काढली. विद्यार्थ्यांसोबत प्रशिक्षित जलतरणपटू असलेले शिक्षक नेणे गरजेचे होते. अनेक विद्यार्थ्यांना पोहता येत नव्हते. संस्थाचालक आणि शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे शिवाजी सलगर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.