शेती हा येथील गावक ऱ्यांचा पूर्वापार उद्योग आहे. येथील भाजीपाल्याचा पंचक्रोशीत पुरवठा होतो. गेल्या शतकात या परिसरातील उद्योगधंद्यांनी रोजगार निर्मितीबरोबरच गावाच्या विकासात आणि लौकिकातसुद्धा भर टाकली. मुंढवा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ही शताब्दीच्या उंबरठय़ावर असलेली येथील संस्था शेतक ऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.

अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा उपलब्ध होणाऱ्या नदीकाठी, मानवी वस्त्या आदी काळात उभ्या राहिल्या, हा जगभरचा इतिहास सर्वज्ञात आहे. पुढील काळात जसजशी, मानवाची सर्वागीण प्रगती होत गेली त्याप्रमाणे देश, प्रांत आणि शहरे, खेडीसुद्धा त्या त्या परिसराच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक परंपरेनुसार वसत गेली. इतिहासाच्या पाऊलखुणांचा वेध घेताना, नगरनियोजनामध्ये प्रामुख्याने माणूस हा घटक केंद्रस्थानी धरून, सुरक्षितता, निसर्गाचे स्वरूप, मानवी मूलभूत गरजा, सुखसोयी, सेवा, यांचा पूर्वापार विचार केलेला दिसतो. शासकीय आणि तत्कालीन जनमानसाचा प्रभाव आणि दबाव सुद्धा, नगरनियोजनावर स्पष्टपणे दिसून येतो. पुणे शहरातील मुंढवा परिसराचा विचार करताना यातील अनेक बाबी प्रकर्षांने जाणवतात.

पुण्याच्या पूर्व भागात वसलेले मुंढवा हे छोटेखानी, परंतु फारसे चर्चेत नसलेले आणि काहीसे उपेक्षित गाव आहे. गावाचे अंतरंग जाणून घेतले तर मात्र या गावाचे वैशिष्टय़ मनामध्ये ठसते. शहराचा विकास लक्षात घेता वस्तीला उपयुक्त परंतु आरोग्याला अपायकारक ठरणाऱ्या बाबी, शहरानजीकच उभारल्या जातात. कालांतराने शहराच्या वाढत्या परिघाबरोबर हे सर्व लोकवस्तीला त्रासदायक ठरून, पुन्हा पर्यायी जागेचा शोध घ्यावा लागतो. स्मशानभूमी, वीटभट्टय़ा, कचरा डेपो, उपेक्षितांच्या वस्त्या याबरोबरच जनावरांचे गोठे, कुंभारवाडा यासाठीपण विकास आराखडय़ामध्ये तरतूद असते. तुरुंग आणि कैद्यांचे पुनर्वसन, सरकारी हॉस्पिटल्स, शिक्षण संस्था यांच्यासाठीही जागेची तरतूद आराखडय़ामध्ये करावी लागते. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने शहरानजीकच्या टेकडय़ा, त्यांचे उतार, वनक्षेत्रे देखील आरक्षित ठेवली जातात. मुंढवा परिसराचा अभ्यास करता, ठळकपणे लक्षात येते, की शहरविकासाच्या दृष्टीने आवश्यक असे प्रकल्प इथे नक्कीच आहेत. मात्र गावाची सधनता आणि समृद्धता वाढवणारे प्रकल्प मात्र इतरत्र आहेत. हा परिसर केवळ बायपाससारखा वापरला जातोय.

मुंढवा गावठाण हा भाग भैरवनाथ मंदिर, गांधी चौक, लालमाडी चौक परिसरात सामावला आहे. नदीकाठचे हे छोटे गाव शिवपूर्वकालीन आहे, अशी माहिती मिळाली. गायकवाड, लोणकर आणि कोद्रे ही येथील मूळ घराणी. छत्रपतींच्या पत्नी सकवारबाई या गायकवाड घराण्यातील आहेत, अशी माहिती बुजुर्ग मंडळींनी दिली. पेशव्यांची स्वारी जेव्हा थेऊर मुक्कामी येत असे, तेव्हा गावातील देशपांडे, खराडकर यांच्या वाडय़ावर भजन, कीर्तनात सहभागी होत असे, असे समजले. पेशवेकाळात हे गाव जेमतेम शंभर उंबऱ्यांचे होते. आता मात्र वस्ती साठ हजारांपुढे गेली आहे. आरक्षित जमिनींच्या इतिहासाची पाने पुन्हा एकदा चाळणे इथे महत्त्वाचे ठरते. गायरान आणि देवराईसाठी जमिनी आरक्षित ठेवण्यामागे तत्कालीन राज्यकर्त्यांनी निसर्ग रक्षणाला धार्मिकतेची जोड दिल्याचे लक्षात येते. महाराष्ट्रात ही परंपरा सहाशे वर्षांपेक्षा अधिक जुनी आहे. शिवपूर्व काळात पाटील, कुलकर्णी आणि येसकर मंडळींना समाज व्यवस्थेतील रचनेनुसार वतने दिली जात होती. छत्रपतींनी वतनाऐवजी कष्ट परिश्रमानुसार वेतनदारी पद्धत सुरू केल्याची माहिती मिळाली. मात्र त्यांच्या पश्चात राजाराम राजेंच्या काळात पूर्वीचीच पद्धत सुरू झाल्याचे सांगण्यात येते. खरे निकष अर्थातच मूळ कागदपत्रे स्पष्ट करू शकतात.

गावातील मंदिरे हे गावक ऱ्यांचे पारंपरिक श्रद्धास्थान असते. महाराष्ट्रातील बहुसंख्य गावांप्रमाणे मुंढव्यातही भैरवनाथ आणि योगेश्वरी देवीचे मंदिर आहे. मुंढव्याचे हे ग्रामदैवत, त्याचा उरुस नुकताच पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. भैरवनाथाचे हे मंदिर हेमाडपंती असून बाराव्या शतकातील आहे, अशी माहिती मिळाली. या मंदिराबरोबरच विठ्ठल रुक्मिणी, सावता महाराज आणि सटवाईचे मंदिर गावात आहे. पूर्वी गावात चावडीवर अथवा मुख्य पारावर पंचायतीकडून न्यायनिवाडे होत असत. तद्वत या गावामध्ये ‘वडारवली’ (वडाच्या पाराखाली) हा भाग प्रसिद्ध आहे. झाड उन्मळून पडले तरी ती परंपरा, जुन्या जाणत्या प्रमुखांनी आजतागायत जपली आहे. फाल्गुन दुर्गाष्टमीला भैरवनाथाचा उत्सव पारंपरिकतेने तमाशा, कुस्त्यांच्या फडांसह साजरा होतो. नवी पिढीदेखील उत्साहाने सहभागी होत असल्याचे मी समक्ष पाहिले. गावकरी मंडळींचा एकोपा हे वैशिष्टय़ लक्षणीय आहे. उच्च-नीच, जात-पातीचा भेदभाव इथे मुळीच नाही. जमिनीचे वाद, गुंडागर्दी इथे नाही. आसपास दारुची दुकाने नाहीत. सारे गाव भावकीच्या नात्याने बांधलेले आहे, असे अनेक ठिकाणच्या चर्चेतून लक्षात आले.

शेती हा गावक ऱ्यांचा पूर्वापार उद्योग आहे. येथील भाजीपाल्याचा पंचक्रोशीत पुरवठा होतो. गेल्या शतकात या परिसरातील उद्योगधंद्यांनी रोजगार निर्मितीबरोबरच गावाच्या विकासात आणि लौकिकातसुद्धा भर टाकली. व्हॅक्क्य़ुम प्लॅन्ट डेक्कन पेपर मिल, भारत फोर्ज, जी क्लेअरेज, कल्याणी स्टील, डायमंड वॉच कंपनी, सिपोरेक्स या उद्योगांचा उल्लेख महत्त्वाचा आहे. मुक्त अर्थव्यवस्थेच्या आणि जागतिकीकरणाच्या वादळात यापैकी काही कारखाने बंद पडले, तरी गावातील तीन-चार पिढय़ांच्या पोटापाण्याची तरतूद इथेच झाली, असे अनेकांनी कृतज्ञतेने सांगितले. सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांचा सहवास गावाला लाभला आहे. गावातील आडाचे पाणी सर्वासाठी खुले करण्यामध्ये हरिमास्तर गायकवाड यांना सावित्रीबाईंनी महत्त्वपूर्ण साथ दिली होती. मुंढवा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ही शताब्दीच्या उंबरठय़ावर असलेली संस्था शेतक ऱ्यांच्या विकासात कटिबद्ध आहे. बाबा आढाव यांनीसुद्धा गावात अनेक वर्षे दवाखाना चालू ठेवला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या काही घराण्यांच्या माध्यमातून गावात अनेक लोकोपयोगी कार्ये होत असल्याची माहिती मिळाली.

गावातील लोकांशी संवाद साधल्यावर, तसेच प्रत्यक्ष भ्रमंतीमध्ये गावाच्या विकासाचे अधिक-उणेपण सहज लक्षात येते. हडपसर, घोरपडी, मांजरी, कोरेगाव पार्क, खराडी या परिसराच्या घेऱ्यात राहणाऱ्या मुंढव्याचा विकास तुलनात्मकरीत्या खूपच कमी वाटतो. गावकरी म्हणतात, की मगरपट्टा सिटी, अ‍ॅमनोरा पार्क या अत्याधुनिक वसाहती मुंढव्यानजीकच आहेत. परंतु असा विकास साधायला गावाला किती वर्षे लागणार हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. शेती क्षेत्रामध्ये समावेश असलेल्या या गावाचा २०१७ साली विकास आराखडय़ामध्ये समावेश झाला आहे. गावाच्या परिघाबाहेर उत्तुंग इमारती, भव्य रस्ते, उच्चभ्रू वस्त्या, सोसायटय़ा आणि झगमगाट दिसतो. मग ते चित्र इथे का नाही दिसत? प्रभावी नेतृत्वाचा अभाव हेच कारण इथे दिसते, असा समज होण्यास वाव आहे.

गावाचे वैशिष्टय़ असलेला सेटलमेंट हा प्रकल्प वेगळा आहे. परंपरागत गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या सोलापूर भागातील काही भटक्या जमातींना या योजनेत स्थिरस्थावर करण्यात आले. पुनर्वसनाची संधी देऊन सामान्य जनजीवनाच्या प्रवाहात सामील करून घेणारा हा प्रकल्प कौतुकास्पद आहे. सवरेदय कॉलनी असे या वसाहतीचे नाव असून पन्नास कुटुंबे आणि त्यांच्या नव्या पिढय़ा इथे लाभार्थी आहेत. सर्टिफाईड हायस्कूल येथेसुद्धा सामान्य जनजीवन जगण्यासाठी पुनर्वसन आणि शिक्षणासाठी बालिकांना सामावून घेतले आहे. इथेच नदीकाठी कोळी समाजाची पण वस्ती आहे. शहराचा विकास होताना नागरी वस्तीला उपद्रव होऊ शकेल असे काही व्यवसाय जाणीवपूर्वक या गावात स्थलांतरित करण्यात आले आहेत. गोठे, कुंभारवाडा, वराह आणि गाढव पालन करणाऱ्या मंडळींचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केशवनगर परिसरात टप्प्याटप्प्याने पार पडतोय. आमदार लक्ष्मण माने, शिवदास जाधव, शिवलाल जाधव यांचा पुढाकार या कार्यात लाभला आहे, अशी माहिती मिळाली.

मुंढवा गावाचा सद्य:स्थितीतील विकास, सेवा कार्ये यांच्या वाटचालीत काही जुन्या जाणत्यांचा उल्लेख आवश्यक आहे. आनंदराव गायकवाड, सखाराम कोद्रे, सुबानराव गायकवाड, शंकरराव लोणकर, सादबा कोद्रे, यशवंतराव गायकवाड, सोपान कोद्रे, हजारे मामा ही जुनीजाणती मंडळी आहेत. अनुभवी तरुण मंडळींचे योगदान लक्षात घेता कैलास कोद्रे, राम गायकवाड, सदानंद कोद्रे, संदीप लोणकर, जयवंतराव गायकवाड, नाना वाडेकर, अप्पा गायकवाड, देवीदास लोणकर, बंडू गायकवाड यांची नावे घेतली जातात. पुण्यनगरीचे महापौर आणि उपमहापौरपद भूषवण्याचा मान (कै.) चंचलाताई कोद्रे आणि बंडू गायकवाड यांच्या रुपाने गावाला मिळाला आहे. तसेच या लेखनासाठी उपयुक्त माहिती, संदर्भ देणाऱ्या बाळासाहेब कोद्रे, प्रवीण गायकवाड, मंदार लवाटे अनिरुद्ध पावसकर यांचाही उल्लेख करायला हवा.

धावता आढावा घेताना, या गावामध्ये मनपाच्या चार शाळा आहेत, परंतु एकही महाविद्यालय नसल्याचे लक्षात येते. विकसित भागांसाठी मुंढवा हे ‘बायपास’ आहे, परंतु या गावातून जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था, अपुऱ्या आणि नादुरुस्त बसेसची संख्या हा अभ्यासाचा विषय आहे. नदीकाठी बाराही महिने अखंडित पाणीपुरवठा करणारी तोटी, सेटलमेन्ट प्रकल्पातील व्यक्तींना बिनबोभाट प्रशिक्षण आणि रोजगार देणारे गिरीश काळे हे उल्लेख अपरिहार्य आहेत.