पिंपरी : बंदुकीच्या धाकाने चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार पिंपळे गुरव येथे घडला. दोन भावांनी प्रसंगावधान राखत चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिपूर येथील रहिवासी सांगबोई कोम सेरटो (वय ४०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ३१ जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गगन बडेजा यांच्या घराची घंटी वाजली. आईने दरवाजा उघडला असता, बाहेर कोणीच नव्हते. काही वेळाने पुन्हा घंटी वाजल्यावर गगन यांनी दरवाजा उघडला. समोर सांगबोई उभा होता. सीताराम बडेजा यांचे पार्सल आले आहे, त्यांचे ओळखपत्र दाखवा असे तो म्हणाला. गगन ओळखपत्र आणण्यासाठी वळताच सांगबोई घरात शिरला.
बंदूक काढून त्याने गगन यांच्या कपाळाला लावली आणि घरातील दागिने आणि मौल्यवान वस्तू आणायला धमकावले. गगनचा भाऊ बाहेर आला. त्याच्यावरही बंदूक रोखण्यात आली. दोघा भावांनी प्रसंगावधान राखत प्रतिकार केला. यावेळी सांगबोईने कंबरेला असलेला चाकू काढून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांनी त्याला पकडून सांगवी पोलिसांच्या ताब्यात दिले.सांगबोई हा मणिपूर येथील आहे. त्याला अटक करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक अमोल नांदेकर यांनी सांगितले.