पुणे : विशिष्ट चवीमुळे मुंबईकराच्या पसंतीस उतरलेल्या बदलापूरच्या काळ्या राघूच्या शिरपेचात भौगोलिक मानंकनाचा (जीआय) तुरा रोवला गेला. पण, यंदा हवामान बदलाचा मोठा फटका बसला आहे. तब्बल एक महिना उशिराने काळा राघू बाजारात दाखल झाला आहे. उत्पादनात पन्नास टक्क्यांपर्यंत घट येण्याचा अंदाज आहे.

यंदा बदलापूर दशक्रोशीतील जाभळांना काहीसा उशिराने मोहोर आला. तयार झालेली आणि काही दिवसांत काढणीला येणाऱ्या जांभळांचे मे महिन्यांच्या सुरुवातीला झालेल्या गारपिटीत मोठे नुकसान झाले. पक्व झालेली आणि पक्व होण्याच्या अवस्थेतील जांभळांचे नुकसान झाले. दर्जेदार जांभळं गारपिटीमुळे मातीमोल झाली. आता दुसऱ्या टप्प्यांत मोहोर आलेल्या जाभंळांची काढणी सुरू झाली आहे. दरवर्षी प्रामुख्याने २० एप्रिलच्या दरम्यान जांभळांची काढणी सुरू होते. यंदा २५ मे नंतर काढणी सुरू झाली आहे. गारपिटीमुळे तब्बल महिनाभर हंगाम लांबणीवर पडला आहे. शिवाय जोमाने आलेल्या पहिल्या बहारातील फळे वाया गेल्यामुळे उत्पादनात पन्नास टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. यंदा शेतकऱ्यांना मध्यम आकाराच्या जांभळांना प्रति किलो ४०० आणि मोठ्या आकाराच्या जांभळांना प्रति किलो ६०० रुपये मिळत आहे. आता नुकतीच काढणी सुरू झाली आहे. मोठ्या झाडांवर रोज जेमतेम दोन-तीन किलो जांभळांची काढणी होत आहे. जीआय मानंकन मिळाल्यामुळे चांगल्या दराची अपेक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांची गारपिटीमुळे घोर निराशा झाली आहे. दुसरीकडे खवय्यांनाही एक महिना प्रतिक्षा करावी लागली. यंदा मोसमी पाऊस वेळेत सुरू होण्याचा अंदाज आहे, त्यामुळे पाऊस सुरू झाला की जांभळांचा हंगाम संपतो. त्यामुळे जांभूळ उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांकडे जेमतेम १५ ते २० दिवसांचा काळ राहिला आहे.

हेही वाचा – कल्याणीनगर अपघात प्रकरणाच्या तपासात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर, पोलिसांकडून तांत्रिक पुरावे संकलित

कर्करोग रोधक ‘ॲन्थोसायनिन’चे प्रमाण जास्त

बदलापूरच्या जांभळामध्ये कर्करोग रोधक ॲन्थोलायनिन या घटकांचे प्रमाण जास्त आढळून आले आहे. अन्य जांभळांमध्ये प्रति १०० ग्रॅममागे ११५.३८ ते २१०.७६ मिली ग्रॅम ॲन्थोसायनिन आढळते. बदलापूरच्या जांभळांत त्याचे प्रमाण २२० मिली ग्रॅमपर्यंत आढळून असल्याचे भाभा अणु संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. सध्या बदलापूर परिसरात ४० वर्षांपेक्षा जुनी १२०० झाडे आहेत. तर फळे देण्याची क्षमता असलेल्या एकूण झाडांची संख्या पाच हजार इतकी आहे, अशी माहिती बदलापूर परिसंवर्धन आणि समुदाय विकास चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य विश्वस्त आदित्य गोळे यांनी दिली.

हेही वाचा – धक्कादायक : संगणक अभियंता मुलाकडून वृद्ध आईचा खून

यंदा दहा हजार झाडांची लागवड

बदलापूर परिसंवर्धन आणि समुदाय विकास चॅरिटेबल ट्रस्ट आणि वन विभागाच्या वतीने जांभळाची दहा हजार रोपे तयार करण्यात आली आहेत. या दहा हजार रोपांची लागवड बदलापूर परिसरातील शेतकरी, खासगी जागेत आणि वन क्षेत्रात यंदाच्या पावसाळ्यात करण्यात येणार आहे. वन विभागाच्या रोपवाटिकेत पाच हजार रोपे तयार करण्यात आली आहेत, असेही वन विभागाकडून सांगण्यात आले.