पुणे : अनिवासी भारतीय नागरिकांच्या अनक्लेम्ड पॉलिसीची माहिती चोरुन बनावट नावाने बँक खाते तयार करण्याबरोबरच मोबाईल क्रमांक बदलून बजाज आलीयान्झ लाईफ इन्शुरन्स  कंपनीची व्यवस्थापकाकडूनच १ कोटी ४७ लाख ८२ हजार २७ रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये फसवणुकीची रक्कम वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येच आहे. याप्रकरणी बलराम कुमार पटवा (वय ३२, रा. मानपुरा पटवा टोली, जि. गया, बिहार) यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मनोज जैन (रा. बिर्ला नगर, ग्वाल्हेर, मध्यप्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. ही घटना २६ मार्च ते १५ एप्रिल या दरम्यानच्या काळात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, बजाज आलीयान्झ लाईफ इन्शोरन्स कंपनीमार्फत अनिवासी भारतीय नागरिकांना जीवन विमा दिला जातो. कन्हैया चटलानी यांच्या वडिलांनी २०११ मध्ये काढलेल्या पॉलिसीच्या मॅच्युरिटी रकमेबाबत विचारणा केली असता ‘पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर उत्तरप्रदेशच्या मैनपुरी येथील बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर ९१ लाख ३ हजार १८२ रुपये पाठविण्यात आले’, असे चटलानी यांना सांगण्यात आले. मात्र ‘उत्तरप्रदेश येथे कोणतेही बँक खाते काढले नसून आपल्याला कुठलीही रक्कम मिळाले नाही’, असे चटलानी यांनी  सांगितले.  

हेही वाचा : पुणे: एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने ५० हजारांचा गंडा

कंपनीच्या वतीने तपास केला असता कंपनीच्या लाईफ पोर्टलवर लॉगइन करुन पॉलिसी काढतांना दिलेला मोबाईल क्रमांक बदलून त्याजागी दुसरा क्रमांक समाविष्ट केल्याचे दिसून आले. तसेच बँक खाते सुद्धा बदलण्यात आल्याचे लक्षात आले. कंपनीच्या अंतर्गत तपासात व्यवस्थापक मनोज जैन याने कंपनीच्या लॅपटॉप मधून चटलानीच्या विमा पॉलिसीमध्ये १९ ऑक्टोबर २०२० पासून ७३ वेळा लॉग इन केले असल्याचे दिसून आले. त्यानंतर जैन याने इतरांच्या पॉलिसीमध्ये कुठे लॉग इन केले आहे का याची माहिती घेतली असता तीन जणांच्या पॉलिसीचे पैसे इतर ठिकाणी पाठविण्याचे समोर आले आहे. हे सर्व विमाधारक अनिवासी भारतीय असून जैन याने कंपनीची १ कोटी ४७ लाख ८२ हजार २७ रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आहे आहे. तसेच इतर पाच जणांच्या पॉलिसीमध्ये फेरफार केल्याच समोर आले असून त्याचा सखोल तपास करण्यात येत आहे. यामुळे फसवणूकीची रक्कम वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.