पुणे : ससून रुग्णालयाशी संलग्न बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागातील एका कनिष्ठ निवासी डॉक्टवर रॅगिंग झाल्याची कबुली देतानाच राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रिफ यांनी यासंदर्भात तीन कनिष्ठ निवासी डॉक्टरांवर सहा महिने निलंबनाची आणि एक लाख रुपये दंड केल्याची माहिती दिली. तसेच अश्तिव्यंगोपचारशास्त्र विभाग प्रमुखांचीही बदली करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रॅगिंगकच्या घटनांमध्ये वाढ होत असून विद्यार्थ्यांचे शारिरीक आणि मानसिक शोषण होत आहे. त्यामुळे आत्महत्येच्या प्रमाणातही वाढ झाली आहे का तसेच बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दोन दिवास डॉक्टरांवर रॅगिंग झाल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. यासंदर्भात कोणत्या उपाययोजना केल्या, याची माहिती विधानसभेत हडपसरचे आमदार चेतन तुपे यांच्यासह अन्य आमदारांनी तारांकित प्रश्नाद्वारे विचारली. त्याला उत्तर देताना मंत्री मुश्रिफ यांनी ही माहिती दिली.
‘राज्यातील वैद्यकीय महाविद्यालायंमध्ये रॅगिंगच्या घटनांमध्ये वाढ होऊन शारिरीक आणि मानसिक शोषणामुळे आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या आरोपात तथ्य नाही,’ असा दावा मुश्रिफ यांनी केला. ते म्हणाले, ‘बी. जे. वैद्यकीय शासकीय महाविद्यालयातील अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागातील एका कनिष्ठ निवासी डॉक्टरवर रॅगिंग झाल्यी तक्रार अधिष्ठातांकडे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत त्याअनुषंगाने अधिष्ठाता स्तरावर तातडीने कार्यवाही करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाकडेही त्यासंदर्भात तक्रार प्राप्त झाली. त्यानुसार अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभागातील तीन कनिष्ठ निवासी डॉक्टरांचे सहा महिन्यासाठी निलंब करण्यात आले असून त्यांना प्रत्येकी एक लक्ष रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभागातील विभाग प्रमुखांची महाविद्यालयातून बदली करण्यात आली आहे. तसेच महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना रॅगिंगच्या घटना रोखण्यासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्याची सूचना करण्यात आली आहे.’
‘राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने रॅगिंग विषयी उपाययोजना करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता स्तरावर स्वतंत्र ॲंटी रॅगिंग समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबतचा आढावा घेत असून अधिष्ठाता यांच्या स्तरावर गठीत करण्यात आलेल्या समितीने महाविद्यालयात होणारे रॅगिंग रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,’ असेही मंत्री मुश्रिफ यांनी स्पष्ट केले.