पुणे : गणेशोत्सवाच्या काळात वाद्यवादन करून गणरायाच्या चरणी सेवा रुजू करणाऱ्या ढोल – ताशा पथकांना सरावासाठी जागा द्यावी, यासाठी काँग्रेसपाठोपाठ आता भाजपही आग्रही झाले आहे. गेल्या आठवड्यात काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली होती. हीच मागणी आता भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनीही बुधवारी केली आहे.
महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन घाटे यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने ढोल ताशा पथकांना महानगरपालिकेने सरावासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली. माजी नगरसेवक अजय खेडेकर, बापू मानकर, रवींद्र साळेगावकर, पुनीत जोशी, सुनील पांडे, राजू परदेशी तसेच ढोल ताशा महासंघाचे अनिश पाडेकर, केतन देशपांडे यावेळी उपस्थित होते. शहराच्या मध्य भागातील महापालिकेच्या ताब्यात असलेली मैदाने तात्पुरत्या स्वरुपात ढोल-ताशा पथकांना उपलब्ध करून द्यावीत, असे पत्र महापालिका आयुक्तांना दिले आहे.
शहरात ढोल ताशाचे वादन करणारी अनेक पथके पुणे शहरात आहेत. गणेशोत्सवाच्या दरम्यान ढोल ताशांचे वादन करण्यासाठी या पथकांचा सराव महिना ते दीड महिना अगोदरच सुरू होतो. मात्र या पथकांना सरावासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने त्यांची अडचण झाली आहे. महापालिकेने ही अडचण सोडवावी अशी मागणी गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या वतीने करण्यात आली होती. त्यानंतर आता भारतीय जनता पक्षाने देखील यामध्ये पुढाकार घेतला असून महापालिका आयुक्तांची भेट घेत पथकांना सरावासाठी जागा द्याव्यात अशी मागणी करण्यात आली.
सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये ढोल-ताशा पथके लयबद्ध पद्धतीने वाद्यवादन करून गणरायाच्या चरणी सेवा रुजू करतात. त्यांना सरावासाठी जागा मिळणे आवश्यक आहे. महापालिकेच्या ताब्यात असलेली मैदाने यासाठी मिळावीत, यासाठी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. – धीरज घाटे, शहराध्यक्ष, भाजप
‘खेळांच्या मैदानावर परवानगी नाही’
‘ढोल ताशा पथकांना कोणी ठराविक जागा द्या, असे म्हणत असेल तर त्यांचा उद्देश तपासला जाईल. मात्र, खेळांच्या मैदानांवर सरावासाठी परवानगी दिली जाणार नाही,’ असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. ‘पुणे शहराचे सांस्कृतिक व गणेशोत्सवातील ढोल पथकांचे महत्त्व लक्षात घेऊन सरावासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असेल. मात्र, त्याचा कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल,’ असेही ते म्हणाले.
ढोल पथकांनी वादन सरावासाठी परवानगी मागितलेल्या ठिकाणांची महापालिकेचे दोन अधिकारी व पथकांचे दोन प्रतिनिधी संयुक्तपणे पाहणी करतील. जवळ शाळा, रुग्णलये नसतील, खेळांच्या मैदानांना अडसर होणार नाही, हे लक्षात घेऊन परवानगीचा निर्णय घेतला जाईल.– ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका