प्रारुप मतदार यादीतील त्रुटी आणि घोळ दूर करण्याची मागणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : शिरूर लोकसभा मतदार संघातील आणि महापालिकेच्या हद्दीबाहेरील वडू या गावातील १२५ पेक्षा जास्त मतदारांचा समावेश टिंगरनेगर-संजय पार्क (प्रभाग क्रमांक २) या प्रभागामध्ये करण्यात आला आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे.

आगामी महापालिका निवडणुकांसाठी महापालिका प्रशासनाने प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. त्यावर सध्या हरकती-सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली भाजप शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त डाॅ. कुणाल खेमनार यांची भेट घेतली. यादीतील त्रुटी यावेळी त्यांच्या निदर्शानास आणून देताना त्रुटी आणि यादीतील घोळ दूर करण्याची मागणी करण्यात आली. माजी आमदार योगेश टिळेकर, माजी सभागृह नेता गणेश बिडकर, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस राजेश येनपुरे, दिपक पोटे, दत्ता खाडे, अर्चना पाटील, योगेश मुळीक, प्रमोद कोंढरे यावेळी उपस्थित होते.

महापालिकेची प्रभाग रचना करताना चुकीच्या पद्धतीने करण्यात आली आहे. नैसर्गिक हद्दी लक्षात न घेता प्रभागांची मोडतोड करण्यात आली आहे. प्रारूप प्रभाग रचना करताना एका प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आले आहेत. काही ठिकाणी गायब झाल्याचे दिसत आहे.  मतदार याद्या संबंधित अधिकाऱ्यांकडून करून घेणे आवश्यक असताना संबंध नसलेल्या लोकांकडून मतदार याद्या फोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यामध्ये चुका झाल्या आहेत. शिरूर लोकसभा मतदार संघातील आणि महापालिकेच्या हद्दीबाहेरील वडू या गावातील १२५ पेक्षा जास्त मतदारांचा समावेश टिंगरनेगर-संजय पार्क (प्रभाग क्रमांक २) या प्रभागामध्ये करण्यात आला आहे.  कर्वेनगर (प्रभाग क्रमांक ३६), फर्ग्युसन महाविद्यालय-एरंडवणा (प्रभाग क्रमांक १६), शनिवार पेठ-नवी पेठ (प्रभाग क्रमांक १७), नांदेडसिटी-सनसिटी (प्रभाग क्रमांक ५२), वडगांव बुद्रुक-माणिकबाग (प्रभाग क्रमांक ५१) या प्रभागांमध्ये चार ते पाच तर काही ठिकाणी दहा ते पंधरा मतदार याद्या दुसऱ्या प्रभागात जोडण्यात आल्या आहेत. शहरातील एकूण ५८ प्रभागांपैकी १७ प्रभागात लोकसंख्या कमी आणि मतदारसंख्या जास्त असे चित्र असल्याच्या त्रुटी भाजपकडून निदर्शनास आणून देण्यात आल्या. शहरातील सर्व प्रभागांमधे प्रभागांतील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून येत आहेत. याबाबत पुणे शहर भाजपच्या वतीने हरकती आणि सूचना देण्यात येणार आहेत, असे जगदीश मुळीक यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp demand removal of outsiders name draft voter list shirur lok sabha constituency pune print news zws
First published on: 28-06-2022 at 19:06 IST