पुण्यात रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे लोकांनी रक्तदान करावं, असं आवाहन पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी केले आहे. त्यांनी शनिवारी सायंकाळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी ही माहिती दिली.
रक्तदान करत असताना एका वेळी एका ठिकाणी १५ पेक्षा अधिक लोक एकत्र यायला नको, हा एक नियम पाळावा लागेल, असंही त्यांनी सांगितलं.
आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी सांगितलं की, आज बँकेविषयी बैठक करण्यात आली. शहरातील किंवा ब्लड बँकांमधील रक्ताचा साठा थोडा कमी झाला आहे. मी सर्व जनतेला आवाहन करतो की, रक्तदान करावं. एका विशिष्ट पद्धतीनं रक्त संकलन करावं. एका ठिकाणी १५ पेक्षा अधिक लोक जमणार नाहीत, याची काळजी घ्यावी. जे नियमित रक्तदाते आहेत त्यांनी आपलं या आधीचं रक्तदान केल्याचं कार्ड आणावं. सोबत एक ओळखपत्रही आणावं. म्हणजे, कोणतीही अडचण येणार नाही.