लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सोमवारी (एक ऑगस्ट) सारसबाग परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.सारसबाग परिसरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त एक ऑगस्ट रोजी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी शहरातील विविध संस्था, संघटना तसेच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होते. या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असून सकाळी सात वाजल्यापासून वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दिली.
जेधे चौकातून सारसबाग चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. जेधे चौकातील उड्डाणपुलावरुन सारसबागेकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. स्वारगेट येथील वेगा सेंटर इमारतीसमोरील समतल विलगकातून (ग्रेड सेपरेटर) सारसबागेकडे वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. टिळक रस्त्यावरील पूरम चौक ते जेधे चौक दरम्यान एकेरी मार्गात वाहनांना आवश्यकतेनुसार दुपारी तीन ते रात्री बारापर्यंत प्रवेश देण्यात येणार आहे. जेधे चौकातून सिंहगड रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी होले चौक, मित्रमंडळ चौक, स्वातंत्र्यवीर सावकर चौकमार्गे सिंहगड रस्त्याकडे जावे. कात्रजकडून सारसबागेकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी उड्डाणपुलावरुन न जाता लक्ष्मीनारायण चौकातून (होल्गा चौक) डावीकडे वळून इच्छित स्थळी जावे.