पुणे : महापालिकेचे आयुक्त म्हणून नवल किशोर राम यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी उपायुक्तांच्या पदभारात बदल केले आहेत. त्यामध्ये महापालिकेत नव्याने बदली होऊन आलेल्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त पदाची जबाबदारी प्रसाद काटकर यांच्याकडे देण्यात आली आहे. काटकर यांच्याकडे निवडणूक विभाग तसेच विधिमंडळ कामकाज समन्वयाची जबाबदारी देखील असणार आहे. प्रशांत ठोंबरे यांच्याकडे असलेला आकाशचिन्ह विभागाचा पदभार काढून त्यांच्याकडे परिमंडळ चार आणि दक्षता विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे. सोमनाथ बनकर यांच्याकडे सुरक्षा, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन, मनपा वसाहती व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे.

स्थानिक संस्था कर, जनगणना आणि जनरल रेकॉर्ड विभाग विजय लांडगे यांच्याकडे, किशोरी शिंदे यांच्याकडे मध्यवर्ती भांडार, क्रीडा उपायुक्त विशेष आणि मुद्रणालय विभाग, अविनाश सपकाळ यांच्याकडे कर आकारणी व कर संकलन आणि महात्मा फुलेवाडा आरक्षित क्षेत्राचे भूसंपादन, माधव जगताप यांच्याकडे परिमंडळ एक याबरोबरच आपत्ती व्यवस्थापन, जयंत भोसेकर यांच्याकडे मोटार वाहन विभाग, मागास वर्ग विभाग, समाजकल्याण आणि तक्रार निवारणची जबाबदारी देण्यात आली आहे. संदीप खलाटे यांच्याकडे अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग, संदीप कदम यांच्याकडे घनकचरा व्यवस्थापन विभागाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे.

महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेले सुनील बल्लाळ यांच्याकडे सांस्कृतिक केंद्र विभाग, मंडई, तांत्रिक, बीओटी सेल आणि परिमंडळ क्रमांक पाच, संतोष वारुळे यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान, पर्यावरण, माहिती व जनसंपर्क सोशल मीडिया आणि आकाशचिन्ह व परवाना विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विजयकुमार थोरात यांच्याकडे परिमंडळ तीन, प्राथमिक आणि माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभाग, वसुंधरा बारवे यांच्याकडे भूसंपादन व्यवस्थापन आणि मालमत्ता व व्यवस्थापन विभाग, अरविंद माळी यांच्याकडे परिमंडळ दोन, प्रशिक्षण प्रबोधिनी आणि समाजविकास विभागाची जबाबदारी सोपविली आहे.