पुणे : राज्य मंडळातर्फे दहावीची परीक्षा आजपासून (२ मार्च) सुरू होत आहे. यंदा २३ हजार १० शाळांतील १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत ६१ हजार ७०८ विद्यार्थ्यांची नोंदणी कमी झाली आहे.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिक बांगर आदी या वेळी उपस्थित होते. बारावीप्रमाणेच दहावीच्या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर नेताना जीपीएस ट्रॅकिंग केले जाईल, प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना वितरित करतानाही चित्रीकरण करण्यात येईल. गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत परीक्षा केंद्रांवर काटेकोर बंदोबस्त ठेवला जाईल, भरारी पथके-बैठी पथके परीक्षा केंद्रावर असतील. विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्याच्या आधी अर्धा तास परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

गोसावी म्हणाले, की विद्यार्थिसंख्या कमी होण्यामागे राज्यातील सीबीएससई, आयसीईएसई अशा मंडळांशी संलग्न शाळा वाढणे, या वयोगटातील मुलांची संख्या कमी होणे अशी कारणे असू शकतात. यंदा शंभर टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होईल. बारावीप्रमाणेच दहावीला वाढीव दहा मिनिटे मिळतील. पालक, विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमातील वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये. मंडळाने प्रसिद्ध केलेले अधिकृत वेळापत्रकच ग्राह्य धरावे. विद्यार्थ्यांनी व्यवस्थित अभ्यास करून दडपण न घेता परीक्षेला सामोरे जावे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात नैराश्य येऊ नये म्हणून समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बारावीच्या इंग्रजी प्रश्नपत्रिकेतील चुकांबाबत दिलगिरी
यंदा बारावीच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत झालेल्या चुकांबाबत राज्य मंडळ दिलगीर आहे. अशा प्रकारांमुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक अशा घटकांमध्ये असलेल्या राज्य मंडळाच्या विश्वासार्हतेला बाधा येऊ शकते याची जाणीव आहे. मात्र या प्रकारात विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. विद्यार्थ्यांना पूर्णपणे न्याय देण्याची दक्षता घेतली जाईल, असे गोसावी यांनी स्पष्ट केले.