खुनाच्या प्रकरणात येरवडा कारागृहात असलेल्या आपल्या मुलांची जामिनावर सुटका करण्यासाठी सत्र न्यायालयातील वरिष्ठ लिपिकाला तब्बल १५ लाखांची लाच देऊन बनावट जामीनपत्रे तयार केल्याप्रकरणी माजी नगरसेवक तानाजी निम्हण याला पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. लिपिकालाही अटक झाली असून, त्याने तयार केलेल्या बनावट जामीनपत्रांच्या आधारे निम्हण यांच्या मुलांची सुटका झाली होती. मात्र, वेळीच हा प्रकार उघड झाल्याने दोन्ही मुलांना पुन्हा अटक करून बनावट जामीनपत्रांचा प्रकार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उजेडात आणला.
दीपक ज्ञानोबा राऊत (वय ५१, रा. कसबा पेठ) असे या लिपिकाचे नाव आहे. सुमारे दीड वर्षांपूर्वी प्रतीक रामभाऊ निम्हण (वय १९) या तरुणाचा गोळ्या झाडून खून झाला होता. त्यात तानाजी निम्हण याची मुले तुषार व चेतन यांना अटक करण्यात आली होती. दोघांची पोलीस कोठडी संपल्यानंतर दीड वर्षांपासून ते येरवडा कारागृहातच होते. पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, तानाजी निम्हण याच्या सांगण्यावरून राऊत याने तुषार व चेतन यांनी बनावट जामीनपत्र व बाँड तयार केले. त्यासाठी राऊत याने पंधरा लाख रुपये घेतले होते. सप्टेंबर महिन्यातच त्यांचा हा व्यवहार झाला होता.
बनावट जामीनपत्रांसाठी राऊत याने सत्र न्यायालयातील संगणकाचा वापर केला. त्याचप्रमाणे त्याच ठिकाणचा शिक्काही मारला. निम्हण याच्यासोबत कारागृहात जाऊन राऊत यानेच तेथील पत्रपेटीत बनावट कागदपत्रांचा लखोटा टाकला होता. या बनावट जामीनपत्रांच्या आधारे तुषार व चेतन हे दोघे २२ नोव्हेंबरला संध्याकाळी साडेसातच्या सुमारास कारागृहातून बाहेर आले. त्यानंतर २८ नोव्हेंबरला प्रतीक निम्हण खून प्रकरणाची न्यायालयात सुनावणी होती. त्या सुनावणीला आरोपी तुषार व चेतन न्यायालयात हजर नसल्याचे लक्षात आल्यानंतर न्यायालयाने कारागृह प्रशासनास स्मरणपत्र पाठविले. त्यावर उत्तर देताना कारागृह प्रशासनाने न्यायालयाला पत्र पाठवले व दोघांच्या जामिनाची पत्रेही पाठविली. त्यानंतर हा सर्व बनाव उघड झाला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तुषार व चेतन यांना अटक केली. त्या दोघांकडे केलेल्या चौकशीत तानाजी निम्हण व दीपक राऊत यांची नावे समोर आली.

पंधरा लाख ‘छमछम’वर उधळले!

बनावट जामीनपत्र तयार करून देण्यासाठी सत्र न्यायालयातील वरिष्ठ लिपिक दीपक राऊत याने पंधरा लाख रुपये घेतले होते. तीन महिन्यांत दोन ते तीन हप्त्यांमध्ये त्याला ही रक्कम देण्यात आली होती. रक्कम मिळाल्यानंतर राऊत हा काही मित्रांना सोबत घेऊन पनवेल भागातील लेडीज बारमध्ये जात होता. लाचेतून मिळालेला सर्वच्या सर्व पंधरा लाख रुपये त्याने याच बारमध्ये उधळले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.