पुणे : महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या पायाला जखम झाल्यानंतर ५ ते ६ दिवसांनी त्याला अचानक अपस्माराचे झटके येऊ लागले. याच वेळी ज्येष्ठाला अपस्माराचे झटके येण्यासह श्वसनास त्रास होऊ लागला. या दोघांनाही ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना धनुर्वाताचे निदान झाल्यानंतर डॉक्टरांनी केलेल्या ४० दिवसांच्या उपचारानंतर दोघेही बरे होऊन अखेर घरी परतले आहेत.

कात्रज येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या १६ वर्षीय मुलाला अपस्माराचे झटके, तोंड उघडता न येणे असा त्रास होऊ लागला. तो २८ ऑगस्टला ससून सर्वोपचार रुग्णालयात औषधवैद्यकशास्त्र विभागात दाखल झाला. या मुलास ५ ते ६ दिवसांआधी पायास जखम झाल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. त्याच दिवशी शिक्रापूरमधील एका ५५ वर्षीय व्यक्तीस अपस्माराच्या झटक्यांसह श्वसनास त्रास होऊ लागल्याने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दोन्ही रुग्णांची लक्षणे ही धनुर्वाताच्या आजाराची होती. दोन्ही रुग्ण अत्यवस्थ होते आणि दोघांनाही श्वसनाच्या गंभीर तक्रारी होत्या. दोन्ही रुग्णांना तत्काळ अतिदक्षता विभागात दाखल करून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यांच्या आवश्यक तपासण्या, रक्तचाचण्या, तसेच औषधोपचार करण्यात आले. योग्य औषधोपचार, प्रतिजैविके आणि पोषण दिल्याने त्यांनी उपचारांना प्रतिसाद देऊन दोघेही हळूहळू बरे होऊ लागले. सुमारे ४० दिवसांच्या रुग्णालयीन उपचारानंतर ते बरे होऊन स्वतःच्या पायावर रुग्णालयातून घरी गेले.

गेल्या वर्षभरात औषधवैद्यकशास्त्र विभागाने धनुर्वाताच्या ३ रुग्णांवर यशस्वीरीत्या उपचार केले आहेत. या रुग्णांवर औषधवैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. एच. बी. प्रसाद व पथकप्रमुख डॉ. हर्षल भितकर, सहयोगी प्राध्यापक यांच्या नेतृत्वाखाली सहयोगी प्राध्यापक डॉ. अभिषेक अगिवाल आणि निवासी डॉक्टर डॉ. साई भार्गव, डॉ. सुहास शिंदे, डॉ. प्रदीप पाटोळे, डॉ. अक्षय राठोड यांनी उपचार केले. परिचारिका भारती नलावडे आणि रेखा पवार यांनी उपचारात महत्त्वाची भूमिका बजावली.

धनुर्वाताची लस घेणे गरजेचे

धनुर्वात हा क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी या जीवाणूमुळे होणारा आजार आहे. तो माती किंवा धूळ लागलेल्या जखमेतून शरीरात प्रवेश करतो. या जीवाणूने तयार होणाऱ्या विषामुळे मज्जासंस्थेवर परिणाम होतो व शरीरात अपस्माराचे झटके, तोंड उघडता न येणे, श्वास घेण्यास त्रास आदी लक्षणे दिसून येतात. योग्य वेळी उपचार न झाल्यास हा आजार जीवघेणा ठरू शकतो. धनुर्वाताची लस घेतल्यास या जीवघेण्या आजाराला प्रतिबंध करता येतो. जखम झाल्यानंतर त्याची स्वच्छता आणि त्वरित धनुर्वाताची लस घेणे आवश्यक आहे, अशी माहिती सहयोगी प्राध्यापक डॉ. हर्षल भितकर यांनी दिली.