पुणे : गेल्या आर्थिक वर्षात करोना काळातही राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या पुणे, नगर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांत मिळून तब्बल १० कोटी ४२ लाख ७४ हजार लिटरची मद्यविक्री झाली आहे. मात्र, या काळात या तीन जिल्ह्यांत मिळून तीन कोटी ४३ लाख आठ हजार लिटरने मद्यविक्री घटली आहे, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

गेल्या वर्षी मार्चअखेर टाळेबंदीमुळे मद्यविक्री दुकाने, मद्यालये बंद करण्यात आली होती. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रतिबंधित क्षेत्रे वगळून मद्यविक्रीची दुकाने खुली करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली होती. पुण्यासह नगर आणि सोलापूर जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्याने आणि करोनाविषयक नियमांचे उल्लंघन के ल्याप्रकरणी अनेक मद्यविक्री दुकाने, मद्यालयांवर कारवाई करण्यात आली होती. याशिवाय व्यवसायच नसल्याने जागा भाडे, कामगारांचे वेतनासह इतर खर्चांमुळे अनेकांनी हा व्यवसायच बंद के ला आहे. परिणामी गेल्या आर्थिक वर्षात मद्यविक्रीला मोठ्या प्रमाणात फटका बसला. तरीदेखील दहा कोटी ४२ लाख ७४ हजार लिटरची मद्यविक्री झाली आहे.

याबाबत राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक संतोष झगडे म्हणाले, ‘करोनामुळे पुणे विभागातील मद्यविक्रीत मोठी घट झाली आहे. भारतीय बनावटीची विदेशी, देशी, बिअर आणि वाईन अशा सर्वप्रकारच्या मद्यप्रकारांत यंदा घट दिसून आली आली आहे. याचा परिणाम महसुलावर देखील झाला आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला दहा कोटी लिटरपर्यंत मद्यविक्री झाली आहे.’