पुणे : ‘मंदिरे, मूर्ती आपल्या देशाचे वैभव आहे. ती आहेत, तोपर्यंत भारतीय सभ्यतेला तडा जाणार नाही. त्यामुळे त्यांचे जतन, संवर्धन आणि निर्मिती करणे आवश्यक आहे,’ असे मत मूर्तिशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी व्यक्त केले. ‘देशाला मंदिरे उभारणारे, धर्म जपणारे पंतप्रधान आता लाभले आहेत,’ असेही ते म्हणाले.
‘कर्नाटकात लोकवर्गणीतून मंदिरे उभारली जातात. त्यांचा जीर्णोद्धोर केला जातो. तशी परंपरा अद्यापही महाराष्ट्रात दिसत नाही. मंदिर, मूर्तींकडे लक्ष देणारी माणसे आहेत की, नाही असा प्रश्न पडतो,’ अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
स्नेहल प्रकाशनाच्या वतीने डॉ. देगलूरकर यांच्या हस्ते चिपळूण येथील साहित्यिक प्रकाश देशपांडे यांना ‘स्नेहांजली’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याच कार्यक्रमात आशुतोष बापटलिखित ‘साद मंदिरांची-ओळख संस्कृतीची’ आणि वसुधा परांजपेलिखित ‘स्वराज्याच्या सौदामिनी’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, प्रकाशक रवींद्र, लेखक बापट आणि परांजपे या वेळी उपस्थित होते.
डॉ. देगलूरकर म्हणाले, ‘मंदिर ही एक सामाजिक संस्था असते. तिथे समाजाच्या सर्व स्तरांतील माणसे एकत्र येत असतात. मंदिर, त्यातील मूर्ती धर्म शिकवतात. धर्म आणि धर्मरक्षणाचे संस्कार आणि संस्कृतीच्या जाणिवा तिथे घडतात. सध्या आपल्या देशाइतकी मंदिरे जगात इतरत्र कुठेही नाहीत. इजिप्त, ग्रीस, इटली, बाबीलोन, मेसोपोटामिया अशा देशांतही मंदिरे उभारली जात होती. मात्र, काळाच्या ओघात, इस्लामच्या आक्रमणात ती नष्ट झाली. या देशात मात्र अद्यापही मंदिरे टिकून आहेत. इंग्रज, ख्रिश्चन, मुस्लिम आक्रमकांनी मंदिरे पाडली. आपण ती पुन्हा उभारत गेलो. ही मंदिरे, मूर्ती आपल्या देशाचे वैभव आहे. ती आहेत, तोपर्यंत भारतीय सभ्यतेला तडा जाणार नाही. त्यामुळे त्यांचे जतन, संवर्धन आणि निर्मिती करणे आवश्यक आहे.’
‘सुमारे ७५ वर्षांपासून खोटा, बंदिस्त इतिहास शिकवण्यात आला. भारत म्हणजे बुरसटलेला, साप-माकडाचे खेळ करणाऱ्यांचाच गरीब देश आहे. ब्रिटिश आले म्हणून हा देश आहे. मोगलांनी इथे संपत्ती आणली, असे अनेक गैरसमज इतिहासातून पेरले गेले. इथली संपत्ती पाहून परकीयांनी या भूमीवर आक्रमणे केली होती. किती खोटा इतिहास शिकवला जातो आणि खरा इतिहास कशा प्रकारे दडवला जातो, हे आता कुठे कळू लागले आहे,’ असे भांडारी यांनी सांगितले.
प्रा. श्याम भुर्के यांनी सूत्रसंचालन केले. मंदिरांचा इतिहास हा तिथल्या स्थापत्याचा, कलेचा आणि संस्कृतीचा इतिहास असतो. त्यात तंत्रज्ञान, विज्ञान असते. तो आपला समृद्ध वारसा आहे. त्यामुळे मंदिर केवळ मंदिर म्हणून पाहू नये. त्यातले वेगवेगळे पैलू शोधायला हवेत. – माधव भांडारी, प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष