नातूबाग मैदानामध्ये वाहने लावणाऱ्या गॅस एजन्सीच्या मालकाशी झालेल्या वादातून राष्ट्रवादीच्या कसबा विभागाचे पदाधिकारी राजेंद्र उर्फ अण्णा ज्ञानेश्वर देशमुख (वय ४८, रा. शुक्रवार पेठ) यांच्यावर सातारा रस्त्यावरील वाळवेकर लॉन्ससमोर धारदार शस्त्रांनी हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी भाजपचे पदाधिकारी दीपक उर्फ बाबा मिसाळ आणि पराग शहा यांच्यासह सहा ते सात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शहाला रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी कौस्तुभ देशमुख (वय २०) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशमुख हे सरस्वती क्रीडा संस्था (कबड्डी)चे कार्याध्यक्ष आहेत. ते सोमवारी रात्री दहा मित्रांसह सातारा रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्या ठिकाणाहून परत येत असताना वाळवेकर लॉन येथे त्यांना रस्त्यात एक दुचाकी आडवी घालून थांबविण्यात आले. त्याठिकाणी आणखी चार ते पाच जण दुचाकीवरून आले. त्यांनी देशमुख यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. देशमुख यांच्यासोबत असलेले सर्व मित्र पळून गेले. हल्ला केल्यानंतर देशमुख हे त्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नातूबाग मैदान येथे देशमुख हे कबड्डीचा सराव करतात. या मैदानात पराग शहा हे गॅस एजन्सीच्या गाडय़ा उभ्या करतात. त्यामुळे मैदान खराब झाल्यामुळे शहा व देशमुख यांची वादावादी झाली होती. शहाने याबाबत बाबा मिसाळ यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे मिसाळ यांनी देशमुख यांना धमक्या दिल्या होत्या. त्यामुळे हा हल्ला मिसाळ यांनीच केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हल्ल्याच्या ठिकाणी पोलिसांना एक मोटारसायकल मिळाली असून याबाबत अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले करत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 4th Dec 2013 रोजी प्रकाशित
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला केल्याच्या आरोपावरून बाबा मिसाळ यांच्यावर गुन्हा
राष्ट्रवादीच्या कसबा विभागाचे पदाधिकारी राजेंद्र उर्फ अण्णा ज्ञानेश्वर देशमुख यांच्यावर वाळवेकर लॉन्ससमोर धारदार शस्त्रांनी हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी रात्री घडली.

First published on: 04-12-2013 at 02:45 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime against baba misal for attempt to murder