पालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे नगरसेवक बाबुराव चांदेरे यांची दोन मुले व भाच्यासह चार जणांविरुद्ध एका वकिलाला मारहाण केल्याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाणेर गावात मंगळवारी संध्याकाळी झालेल्या या घटनेत वकिलावर तलवारीने वार करण्यात आले आहेत. या घटनेनंतर आरोपी पसार झाले आहेत. मारहाणीचे कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
अॅड. आशिष अर्जुन ताम्हाणे (वय २६, रा. शिवसागर हॉटेलमागे, बाणेर) असे या मारहाणीत जखमी झालेल्या वकिलाचे नाव आहे. या प्रकरणी समीर बाबुरान चांदेरे, किरण बाबुराव चांदेरे, गणेश इंगवले, मनोज इंगवले व त्यांच्या एका साथीदाराविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताम्हाणे यांनी या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास ऍड. ताम्हाणे हे मोटारसायकलवरून बाणेर रस्त्याने घरी चालले होते. निळ्या रंगाच्या दुसऱ्या एका मोटारसायकलवरून आलेल्या आरोपींनी माऊली पेट्रोल पंपासमोर ऍड. ताम्हाणे यांच्या मोटारसायकलला मागच्या बाजूने धडक दिली. त्यामुळे  ताम्हाणे हे खाली पडले. त्याचवेळी समीर चांदेरे, किरण चांदेरे, गणेश इंगवले, मनोज इंगवले हे चौघे एका मोटारीतून त्या ठिकाणी आले. त्यांच्या हातात तलवार, बेसबॉल स्टीक, हॉकी स्टीक होती. आरोपींनी  ताम्हाणे यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यांच्यावर तलवारीचे वारही करण्यात आले. या घटनेत ते गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
 घटनेनंतर सर्व आरोपी पसार झाले आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. ही मारहाण नेमक्या कोणत्या कारणांनी करण्यात आली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, त्यामागे राजकीय कारण असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime of attempt of murder on sons of former standing comm chairman chandere