‘टोल’फोड करण्यास चिथावणी देणारे वक्तव्य केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात मंगळवारी पुणे जिल्ह्यातील दोन पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. राजगड आणि लोणी-काळभोर पोलीस ठाण्यांमध्ये राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या इतर पदाधिकाऱयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मनसेच्या पदाधिकाऱयांनी आणि सहकाऱयांनी टोल भरू नये. टोल मागण्यासाठी कोणी आडवा आला, तर त्याला तुडवून काढा, असा आदेश राज ठाकरे यांनी रविवारी नवी मुंबईमध्ये पक्षाच्या कार्यक्रमात दिला होता. त्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील विविध टोल नाक्यांवर हल्लाबोल केला. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पुण्याजवळील खेड-शिवापूर टोलनाक्यावर वाहने अडवून एसटी बसेसवर दगडफेक केल्याप्रकरणी राजगड पोलीसांनी राज ठाकरे यांच्यासह एकूण १७ जणांवर गुन्हा दाखल केला. यामध्ये राज ठाकरे यांना प्रमुख आरोपी ठरविण्यात आले आहे. राज ठाकरे यांनी टोलनाक्यावरील वसुली बंद करा, आंदोलन करा, असे चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जमावबंदीचा आदेश मोडून टोलनाक्यावर दगडफेक करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्यासह पक्षाचे पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांच्यावरही राजगड पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. राजगड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक हणमंत शिंदे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींवर भारतीय दंडविधान संहितेच्या कलम १४३, १४७, १४९, ३४१, ३५३, ३३२, ३३३, १०९, ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.