वीररसाचे प्रतीक म्हणून जपलेला जेजुरीचा मर्दानी दसरा आज आधुनिक युगातही त्याच्या खंडा उचलणे, आतषबाजी, पालखी सोहळा आदी परंपरांनी अद्याप जिवंत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जेजुरीचा खंडोबा हे साऱ्या महाराष्ट्रातील अठरापगड जातीचं कुलदैवत. येथील दसरा उत्सव म्हणजे आनंदाची पर्वणी असते. खंडोबा गड व कडेपठारावरील पालख्यांची मध्यरात्री होणारी भेट, एक मण (४२ किलो) वजनाचा प्राचिन खंडा (तलवार) उचलण्याची कसरत, फटाक्यांची आतषबाजी व तब्बल अठरा तास चालणारा पालखी सोहळा हे येथील दसऱ्याचे वैशिष्टय़ आहे.

या उत्सवातील प्रथेप्रमाणे नऊ दिवस येथील कोल्हाटी समाजातील कलावंत, वाघ्या-मुरुळी, गोंधळी जुनी गाणी म्हणून देवापुढे हजेरी देतात, तर घडशी समाजातील कलाकार दिवस-रात्र गडावर सनई-चौघडा, नगारा वाजवतात. दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी पेशव्यांनी सूचना दिल्यावर हजारो ग्रामस्थ व भाविकांच्या उपस्थितीत पालखीत खंडोबा व म्हाळसादेवीच्या मूर्ती ठेवून पालखी भेटाभेट सोहळ्यासाठी निघते. सदानंदाचा येळकोट या जयघोषात भंडाऱ्याची मुक्त उधळण होते. पालखी गडामधून डोंगरदरीमधील रमणा येथे आणून ठेवली जाते. रात्री हजारो भाविक कडेपठारावरील खंडोबा मंदिरात जातात. तेथून नऊ वाजता पारंपरिक वाद्यांच्या निनादात तेथील पालखी भेटीसाठी निघते. अंधारामध्ये दिवटय़ा, मशाली, हवाईनळे पेटवून उजेड केला जातो.

पालखी अवजड असल्याने खांदा देण्यासाठी पन्नास ते साठ खांदेकरी असतात. वाटेतील कठीण वळणे, उंचवटे पार करताना खांदेकऱ्यांचे कसब पणाला लागते. सुसरटिंगी येथील निमुळती, उंच टेकडी पार करताना पालखीच्या खांदेकऱ्यांना इतरांनी हाताची साखळी करून वर ओढावे लागते. पालखी डोंगरातील ओटय़ावर ठेवल्यानंतर हजारो भाविक खोल असलेल्या दरीमध्ये उतरतात. या दरीतच रात्री दोनच्या सुमारास भेटाभेट सोहळा सुरू होतो.

रात्रीचे चांदणे, ‘येळकोट येळकोट, जय मल्हार’ ही डोंगर दऱ्यात घुमणारी ललकारी, फटाक्यांची आतषबाजी, आकाशाकडे मुक्तपणे झेपावणाऱ्या रंगीत तोफा अशा भारावलेल्या वातावरणात ही भेट घडते. दोन्ही पालख्यांच्या मागे नाभिक समाजातील मानकरी आरसे धरतात. पालखीसमोर पेटवलेले भुईनळे व हवाई नळय़ांच्या उजेडात आरशामध्ये दोन्ही पालख्यातील मूर्तीचे एकमेकांचे दर्शन घडते. हे झाल्यावर भेटाभेट झाल्याचे घोषित केले जाते. यानंतर रमण्यातील पालखी पुन्हा खंडोबा गडाकडे येण्यास निघते. वाटेत आपटापूजन झाल्यावर रावण दहन केले जाते. पहाटे पालखी गडाच्या पायथ्याशी येते. येथे धनगर समाजातील पारंपरिक कलावंत सुंबरान मांडून धनगरी ओव्या व गाणी म्हणतात. मेंढय़ाची लोकर पालखीवर उधळली जाते. देव सकाळी गडावर आल्यावर स्थानिक कलावंत निरनिराळी गाणी म्हणून दमलेल्या देवांचे मनोरंजन करतात.

यानंतर ऐतिहासिक खंडा (तलवार) उचलण्याची स्पर्धा सुरू होते. गडावर असणारा हा खंडा पेशवाईच्या काळात सोनोरीचे सरदार रामराव व महिपतराव पानसे यांनी खंडोबाला अर्पण केल्याचा इतिहास आहे. हा खंडा एका हातात जास्त वेळ उचलून धरण्याची व कसरती करण्याची स्पर्धा होते. कसरती पाहण्यासाठी अनेक परदेशी पाहुणेही येतात. काही स्पर्धक वीस ते पंचवीस मिनिटांपर्यंतही खंडा उचलून धरतात. तर दाताने तलवार उचलणे, एका हाताने युध्दासारखी फिरवणे, दातात धरून उठाबशा काढणे आदी चित्तथरारक कसरती पाहायला मिळतात.

हा तर मर्दानी दसरा!

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी चाळीस वर्षांपूर्वी येथील दसऱ्याचा सोहळा डोंगरात पूर्ण वेळ डोळे भरून पाहिला आणि त्यांच्या तोंडून सहज शब्द आले हा साधासुधा दसरा नाही हा तर ‘मर्दानी दसरा’. त्यावेळेपासून जेजुरीच्या दसऱ्याला ‘मर्दानी दसरा’ असे संबोधले जाऊ लागले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dasara celebration in jejuri