सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एक पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर दुसरी पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन वर्षांत पदवी पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच प्रथम पदवी किंवा प्रथम पदव्युत्तर पदवी मिळाल्यानंतर कमाल चार वर्षांत द्वितीय पदवी, द्वितीय पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेणे अनिवार्य असल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले.
हेही वाचा >>>कोरेगाव भीमा ऐतिहासिक स्तंभ परिसरात सभा घेण्यास बंदी
विद्यापीठाने या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. विद्यापीठ अधिकार मंडळाने विज्ञान, कला, संगणकशास्त्र, गणित, इलेक्ट्रॉनिक्स आदी पदवी विषयांसाठी निर्णय घेतला आहे. संलग्नित महाविद्यालय आणि स्वायत्त महाविद्यालय यांनी त्यांच्या प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना द्वितीय पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश देऊ नये. द्वितीय पदवी प्रवेशित विद्यार्थ्यांना नवीन पीआरएन नंबर देण्यात येईल. त्याची वैधता विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमाप्रमाणे तीन वर्षे राहील. याचा अर्थ विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेल्या शैक्षणिक वर्षापासून तीन वर्षात त्याने द्वितीय पदवीचे शिक्षण पूर्ण करणे अनिवार्य राहील. प्रथम पदवी घेताना श्रेयांक निवड पद्धती (चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टिम) नसलेल्या विद्यार्थ्यांची द्वितीय पदवी निकाल प्रक्रिया टक्केवारी पद्धतीने जाहीर करावी, निकाल जाहीर करताना द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्षांचा एकत्रित गुणांचा विचार केला जातो. त्यामुळे या प्रकारच्या पद्धतीने प्रथम पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची निकाल प्रक्रिया पूर्ण करताना, त्यांचे प्रथम पदवीचे संपादणूक विचारात घेणे क्रमप्राप्त राहील. प्रथम पदवी किंवा प्रथम पदव्युत्तर पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांना संलग्नित महाविद्यालयातून द्वितीय पदवी किंवा द्वितीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांस प्रवेश देता येईल. तसेच संलग्नित महाविद्यालयातून प्रथम पदवी अथवा प्रथम पदव्युत्तर पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना स्वायत्त संस्था, महाविद्यालय येथे प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल. अभ्यासक्रमात काही बदल असल्यास समकक्षता विद्यार्थ्यांना घ्यावी लागेल. या विषयांचे मूल्यमापन महाविद्यालय स्तरावरच करण्यात येणार आहे.
हेही वाचा >>>पुणे: आमदार मुक्ता टिळक यांच्या अंत्ययात्रेसाठी मध्य भागात वाहतूक बदल
निकाल प्रक्रिया राबवताना प्रथम पदवीच्या किंवा प्रथम पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाव्यतिरिक्त सर्व संपादणूक आणि द्वितीय पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांची अंतिम वर्षाची संपादणूक विचारात घेऊन अंतिम निकाल किंवा अंतिम श्रेणी किंवा निश्चित होईल. त्यानुसारच पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रमाणपत्र दिले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
