समाज माध्यमांतून चळवळ; अनेक गरजूंना दोन वेळचे जेवण
पुणे : केवळ शनिवार-रविवारीच नव्हे तर आठवडय़ाचे सर्व दिवस, कोणत्याही वेळी गजबजलेली पुण्यातील सगळी लोकप्रिय हॉटेल्स सध्या बंद आहेत. मात्र, पडद्यामागे आपले भटारखाने गरजू व्यक्तींसाठी सुरू ठेवून, सामाजिक बांधिलकीचा एक वेगळा आदर्श या हॉटेल्सच्या चालकांनी घालून दिला आहे. बंदमुळे कोणीही उपाशी राहू नये याची पुरेपूर खबरदारीही हॉटेलचालक घेत आहेत.
समाज माध्यमांपैकी ‘फेसबुक’ या व्यासपीठावर सक्रिय असलेल्या ‘पुणे ईट आऊट्स’ या समूहावरून ही चळवळ सुरू झाली. ‘बंद’ची घोषणा झाल्यानंतर अनेक गरजूंना दोन वेळचे जेवण मिळणार नाही, हे लक्षात घेऊन या व्यावसायिकांनी आपले भटारखाने सुरू केले. ‘पुणे ईट आऊट्स’चे अनिरुद्ध पाटील म्हणाले, जेवण देऊ शकतील असे व्यावसायिक आणि गरजू व्यक्तींपर्यंत ते जेवण पोहोचवू शकतील अशा व्यक्ती आणि संस्था यांची सांगड घालणे महत्त्वाचे होते. ते ‘फेसबुक’सारख्या व्यासपीठामुळे शक्य झाले. हॉटेल्सचा व्यवसाय बंद असताना अशी मदत करण्यासाठी पुढे येणे खरोखरच कौतुकास्पद आहे. केवळ हॉटेल व्यावसायिकच नव्हेत तर सामान्य नागरिकांनीही या कामात शक्य तो सहभाग घेतला आहे. या कठीण काळात असे काम होणे आवश्यक होते, त्यातील दुवा ठरलो याचे समाधान आहे.
‘पर्श’चे चैतन्य आडगांवकर म्हणाले, बंदनंतर किमान चार हजार फूड पॅकेट तयार केले. डोनेट मील पुणे, आसरा फाउंडेशन यांच्या मदतीने ते गरजूंपर्यंत पोहोचवतो. भाज्या आणि इतर ताजे पदार्थ उपलब्ध होण्यात अडचणी आहेत, मात्र डाळ, तांदूळ, तेल यांचा साठा पुरेसा असल्यामुळे खिचडी करणे सोपे आहे. आमचे परगावचे कर्मचारी त्यांच्या गावी परत जाऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या मदतीने हे जेवण बनवत आहोत. सद्य:स्थितीत शक्य ती सर्व मदत सर्वानी केली पाहिजे, हीच भावना आहे.
‘ऑब्लिक किचन’चे अतुल पेंडसे म्हणाले, चिमुकला घास या स्वयंसेवी संस्थेला रोज २५०-२७५ फूड पॅकेट देतो. बंदचा परिणाम व्यवसायावर झाला आहे. पण सद्य:स्थितीत त्याबाबत विचार करण्याची वेळ नाही. कमीतकमी माणसे एकत्र येऊन आम्ही हे पदार्थ तयार करत आहोत. ‘मराकेश’चे गौरव गीते म्हणाले, मागील १५ दिवस रोज ७० ते १०० फूड पॅकेट तयार करतो. गॅस मिळवणे, किराणा माल, भाज्यांची उपलब्धता ही अडचण आहे. त्यामुळे उपलब्ध होणाऱ्या सामुग्रीमध्ये अधिकाधिक दिवस ही पॅकेट्स कशी करून पुरवता येतील हा विचार आहे. वर्षभर ग्राहक आमच्याकडे येतात. आम्ही भरपूर व्यवसाय करतो, आत्ता गरजूंना जेवण पोहोचवून त्याची परतफेड करण्याची संधी आहे, असे मानून सर्व अडचणींवर मात करून हे काम करत आहोत.