पिंपरी : शहरातील २०४१ पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून पिंपरी-चिंचवड महापालिकेने नवीन विकास आराखडा तयार केला आहे. हा आराखडा हरकती, सूचनांसाठी पुढील आठवड्यात प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यावर सुनावणी होऊन आराखडा अंतिम करण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. नवीन आराखड्यात चऱ्हाेली, माेशी, रावेत, किवळे, मामुर्डी, ताथवडे या समाविष्ट गावांतील विकासाला संधी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा २००२ मध्ये आराखडा तयार करून प्रसिद्ध करण्यात आला हाेता. त्याला २००८-०९ मध्ये मंजुरी मिळाली. या आराखड्याची मुदत २०२० मध्ये संपली. महापालिकेने नवीन आराखड्यासाठी २०१८ मध्ये इरादा प्रसिद्ध केला. आराखडा तयार करण्यासाठी गुजरातमधील ‘एचसीपी’ या संस्थेची नियुक्ती केली होती. दहा काेटी रुपयांमध्ये आराखडा तयार करण्यात आला आहे.
संस्थेने संपूर्ण शहरातील माेकळ्या जागांचे भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे (जीआयएस) सर्वेक्षण केले. जागांचा प्रत्यक्ष वापर पाहिला. २०४१ पर्यंत शहराची लाेकसंख्या किती हाेईल. लाेकसंख्येच्या गरजेनुसार रस्ते, शाळा, उद्याने, रुग्णालयांसह मूलभूत सुविधांची आरक्षणे टाकण्यात आली आहेत. सर्वसाधारण सभेचे अधिकार असलेल्या प्रशासकांची मान्यता घेऊन आराखडा हरकती, सूचनांसाठी महापालिकेचे संकेतस्थळ आणि महापालिकेतील फलकावर प्रसिद्ध केला जाईल.
हरकतींसाठी एक महिन्याची मुदत दिली जाईल. सामाजिक संस्था, शहरातील आणि शहराबाहेरीलही नागरिक हरकत घेऊ शकतील. हरकतींवरील सुनावणीसाठी सात जणांची नियाेजन समिती स्थापन केली जाईल. ही समिती याेग्य हरकतींची शिफारस करेल. शिफारस स्वीकारण्याबाबतचा अधिकार सर्वसाधारण सभेकडे राहील. त्यानंतर झालेल्या बदलांसह सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने आराखडा शासनाकडे पाठविला जाईल.
…तर शासनाकडे अधिकार
महापालिकेच्या आराखड्याची २०२० मध्येच मुदत संपली. कराेना, लाेकसभा आणि विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता आणि विविध कारणांमुळे महापालिकेने १८ मे २०२५ पर्यंत मुदतवाढ घेतली होती. या मुदतीत विकास आराखडा प्रसिद्ध न केल्यास शासनाकडे अधिकार जातील. त्यामुळे १८ मे पर्यंत आराखडा प्रसिद्ध करावा लागणार आहे.
ताथवडेचा विकास आराखडा रद्द
महापालिकेत ताथवडे गावाचा २००९ मध्ये समावेश झाला आहे. या गावाचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्यात आला होता. त्याची मुदत २०३८ पर्यंत हाेती. परंतु, शहराचा नवीन विकास आराखडा तयार करण्यात आला. त्यामुळे ताथवडेचा आराखडा रद्द करण्यात आला आहे.
५० टक्केच अंमलबजावणी
मागील विकास आराखड्याची १०० टक्के अंमलबाजवणी झाली नाही. केवळ ५० टक्के अंमलबजावणी झाली. रस्त्यांची कामे मात्र ६५ टक्के झाल्याचा दावा महापालिकेने केला.
नवीन विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. हरकती, सूचनांसाठी ताे पुढील आठवड्यात प्रसिद्ध केला जाईल. सर्व प्रक्रिया हाेण्यास चार महिन्यांचा कालावधी लागेल.- प्रसाद गायकवाड, उपसंचालक, नगररचना विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका