पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य केवळ मुर्खपणाचे आहे. प्रसिध्दी मिळविण्याकरिता ‘बदनाम हुए तो क्या हुए नाम तो हुआ’ असे एक हिंदीतील वाक्य आहे. अशाप्रकारे जितेंद्र आव्हाड करत असतात. हा एक त्यांचा स्वभाव आहे. खरे म्हणजे प्रभू श्रीराम हे सगळ्यांचेच आहेत.”
“बहुजन, अभिजन, दलितांचे, आदिवासी असा कोण आहे या देशात ज्यांचे प्रभू श्रीराम नाहीत. उगाचच मग ते शाकाहारी, मांसाहारी विनाकारण लोकांच्या भावनांना ठेस पोहोचविले जाते. वारकरी, माळकरी, धारकरी, टाळकरी हे सगळे बहुजन समाजाचे आहेत. हे सगळे प्रभू श्रीराम यांना मानतात,” असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
“यातील सर्व लोक शाकाहारी आहेत. हा त्यांचा अपमान नाही का? त्यामुळे अशाप्रकारे विनाकारण वाद काढणे, लोकांच्या भावना दुखावणे आणि अशांतता तयार होईल असे वागणे चुकीचे आहे. जे लोक स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात असे लोक त्यावर मौन बाळगून आहेत. साधा निषेधही करत नाहीत याचे मला आश्चर्य वाटते,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.