पुणे : वाघोलीतील अपघातात जानकी पवार हिच्या पोटावरून डंपरचे चाक गेले. यामुळे तिचे श्वासपटल फाटून आतडे छातीच्या भागात सरकले. तिची स्थिती गंभीर असल्याने ससून रुग्णालयात तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. तब्बल चार तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर अखेर तिला वाचविण्यात डॉक्टरांना यश आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जानकी पवार हिला गंभीर अवस्थेत ससूनमध्ये सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास आणण्यात आले. तपासणीत श्वासपटल फाटून आतडे छातीत वरच्या बाजूला सरकल्याचे निदान झाले. तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. सर्वप्रथम छातीत वरच्या बाजूला सरकलेले आतडे योग्य ठिकाणी पुन्हा बसविण्यात आले. त्यानंतर तिचे फाटलेले श्वासपटल डॉक्टरांनी शिवले. या शस्त्रक्रियेसाठी चार तासांहून अधिक वेळ लागला. ही शस्त्रक्रिया डॉ. लता भोईर यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या पथकाने केली.

हेही वाचा…भुजबळांसंदर्भात अजित पवार यांची सावध भूमिका

‘जानकीच्या शरीरातील इतर अवयवांना कोणतीही इजा झालेली नाही. त्यामुळे तिची प्रकृती सध्या स्थिर आहे. सध्या तिला अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तिच्या प्रकृतीवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तिला बरे होऊन रुग्णालयातून घरी सोडण्यास किमान १५ दिवसांचा कालावधी लागेल,’ अशी माहिती डॉ. लता भोईर यांनी दिली.

मुख्यमंत्री कार्यालयातून दूरध्वनी

वाघोली अपघातानंतर मुख्यमंत्री कार्यालयातून ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांना तातडीने दूरध्वनी आला. त्यांना जखमींवर उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. याचबरोबर जखमींसाठी इतर काही मदत लागल्यास लगेच मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधण्यासही सांगण्यात आले.

हेही वाचा…भुजबळ यांना राष्ट्रीय स्तरावर पाठवण्यासाठीच मंत्रिमंडळात स्थान नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

नेमकं काय घडलं?

नगर रस्त्यावर सोमवारी मध्यरात्री भरधाव डंपरने पदपथावर झोपलेल्या नऊ जणांना चिरडल्याची घटना घडली. याप्रकरणी डंपर चालकाला वाघोली पोलिसांनी अटक केली आहे डंपर चालक दारूच्या नशेत असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी डंपर चालक गजानन शंकर तोटरे याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भोसले आणि त्यांचे नातेवाईक वाघोली परिसरात मजुरी करतात. ते सर्व जण वाघोली पोलीस ठाण्यासमोरील मोकळ्या गायरान जागेत पदपथावर झोपतात. सोमवारी मध्यरात्री सर्व जण गाढ झोपेत होते. त्यावेळी पुण्याकडून केसनंदकडे भरधाव वेगाने डंपर निघाला होता. दारूच्या नशेत असलेल्या डंपर चालकले डंपर पदपथावर नेला. डंपरच्या चाकाखाली नऊ जण चिरडले गेले. गंभीर जखमी झालेल्या नऊ जणांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वी तिघांचा मृत्यू झाला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doctors managed to save wagholi accident victim janki pawar after four hour long surgery pune print news stj 05 sud 02