कबुतर या पक्ष्याची ओळख ही चिऊ-काऊसारखी बालगीते-गोष्टींमधून झाली नसली, तरीही हा पक्षी आपल्याला तितकाच जवळचा. सिनेमांत प्रियकर-प्रेयसीच्या चिठ्ठयांची ने आण करणारा पक्षी, लहानपणी ‘चंद्रकांता’ सारख्या परीकथेच्या वळणावर जाणाऱ्या मालिकेतील राजकन्येने पाळलेले पक्षी किंवा कधी गोष्टींतून कबुतराने निरोप दिल्याचे उल्लेख, अशा स्वरूपांत या पक्ष्याशी अनेकांची ओळख झाली असेल. डौलदार, शांत अशी पहिली छबी मनात उमटवणाऱ्या या पक्ष्याचे ‘पारवे’ हे भाईबंद खिडक्या, बाल्कनींमध्ये ठाण मांडून बसले की त्याचा शाब्दिक राग आपण कबुतरांवरही काढला असेल. अशा अनेक बऱ्या वाईट ओळखींच्या पलीकडे जाऊन या पक्ष्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर एक विशेष स्थान आहे. मोठी आर्थिक, सामाजिक उलाढाल, प्रतिष्ठा कबुतरांच्या शर्यतीभोवती घिरटय़ा घेत असते.. तीही अगदी अठराव्या शतकापासून!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जगत्व्यापी कबुतर शर्यती

आपल्याकडेही अगदी हौशीने ढाबळी राखल्या जातात. काळानुसार आता जागेची टंचाई जाणवत असली तरीही गच्ची, बाल्कनी, मिळेल त्या जागेत अनेकांकडे, अगदी शहरातही ढाबळी आहेत. थंडीची सुरूवात, सुखावणारी हवा, उतरतीला लागलेले उनही छान वाटावे असे वातावरण आणि त्यात आकाशात पहाटे आणि संध्याकाळी उडणारे कबुतरांचे थवे! त्यावरून चाललेली र्हुे आजही पुणे, ठाणे, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर अशा शहरी-निमशहरी भागांतही दिसते. मात्र आपल्याकडे सर्वाधिक प्रचलित असणाऱ्या ‘बाजी’ किंवा खेळ या प्रकारांपेक्षा खूप वेगळ्या स्वरूपात जगाच्या पातळीवर कबुतरांच्या शर्यती चालतात. कबुतरांची शर्यत ही युरोपातील देशांमध्ये खूप प्रतिष्ठेची! अगदी घोडय़ांच्या शर्यतीसारखीच. खुद्द इंग्लंडच्या राणीचीही स्वत:ची कबुतरे आहेत. कबुतरांची शर्यत हा बेल्जिअमचा राष्ट्रीय खेळ म्हणूनही मानला जातो. अमेरिका, कॅनडा, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, आशिया, चीन, जपान, फिलिपिन्स, तैवान, बांगलादेश, पाकिस्तान, इराण या देशांमध्ये या शर्यतींचा छंद जोपासला जातो. भारतातही स्थानिक पातळीवरच्या खेळांबरोबरच या शर्यतीदेखील होतात. मात्र जगाच्या तुलनेत अद्यापही आपल्याकडे या खेळाचे स्वरूप खूप छोटे आहे.

होमिंग पिजन

शर्यतींसाठी होमिंग पिजन या प्रजातीतील कबुतरे असतात. खरेतर ही काही नैसर्गिक प्रजाती नाही. वेगवेगळ्या प्रजातींच्या संकरातून ही प्रजाती तयार झाली आहे. आपल्या ढाबळीतील चांगल्या कबुतरांचे ‘ब्रिडिंग’ करून आपल्या ढाबळी राखल्या जातात. वेगवेगळ्या शर्यतीत जिंकलेल्या कबुतरांच्या पुढील पिढय़ा पालकांकडून जिवापाड जपल्या जातात.

कबुतरप्रेमाची ख्याती

पाळीव पक्षी जगतात कबुतर हा सर्वांत जुना पाळीव पक्षी मानला जातो. आपले घर हुडकून काढण्याच्या निसर्गदत्त शक्तीमुळे संदेशवहनासाठी हा पक्षी पाळण्याचा इतिहास सर्वज्ञात आहेच. कबुतरातील याच खुबीचा वापर करून त्याच्या शर्यती आणि खेळाची संस्कृती रुजत गेली. अठराव्या शतकापासून कबुतरांच्या शर्यतीच्या नोंदी आहेत. इंग्लंडची राणीही कबुतर प्रेमासाठी प्रसिद्ध आहे. राणीच्या ढाबळीत २०० पक्षी आहेत. गेल्याच वर्षी तब्बल ४० हजार पौंड म्हणजेच साधारण ३३ लाख रुपये खर्च करून या ढाबळीचे नूतनीकरण करण्यात आले. त्यामुळे इंग्लंडच्या राणीचे कबुतर प्रेम चर्चेत आले होते.

अवाढव्य आर्थिक उलाढाल

जगात हिरीरीने खेळल्या जाणाऱ्या कबुतर शर्यतींच्या भोवती मोठी आर्थिक उलाढाल चालते. काही कोटी डॉलर्सची उलाढाल, बक्षिसे, शर्यतींवरील बोली यांतून होते. फक्त इंग्लंडमध्ये २० लाख शर्यतींची कबुतरे आहेत. शर्यत जिंकणाऱ्या कबुतरांच्या किमती या निव्वळ डोळे फिरवणाऱ्याच!  याची काही उदाहरणेच द्यायची झाली तर २०१३ मध्ये उसेन बोल्ट या धावपटूच्या नावावरून ‘बोल्ट’ असे नाव असणारे, सर्वाधिक गतिमान म्हणून ख्याती मिळवलेले कबुतर ३ लाख १० हजार युरोज म्हणजे साधारण अडीच कोटी रुपयांना विकले गेले. चीनमधील एका व्यापाऱ्याने ते विकत घेतले. त्यापूर्वी २००८ मध्ये ८ लाख रॅंड (द.आफ्रिकेचे चलन ) म्हणजे साधारण ४० लाख रुपयांना विक्रम प्रस्थापित केलेल्या एका कबुतराचा लिलाव झाला.

वादांचेही कारण

या शर्यती अनेक वादांतही सापडल्या आहेत. शर्यतीतील ४० टक्केच कबुतरे घरी परततात आणि बाकीची हरवून जातात, असा अहवाल ‘पेटा’ या प्राण्यांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या संस्थेने दिला होता. त्यामुळे या शर्यती वादात सापडल्या होत्या. त्याचप्रमाणे कबुतरांना उत्तेजक द्रव्य देण्यावरूनही शर्यतींवरील वाद सातत्याने होत असतात. या शर्यती आणि त्यांना चिकटलेली प्रतिष्ठा या अनेक देशांमध्ये स्थानिक राजकारणातील घटकही बनतात.

 

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dove