पुणे : ‘भारताने स्वातंत्र्यानंतर मोठी प्रगती केली असली, तरी महात्मा गांधी यांना अपेक्षित समाजरचनेच्या मार्गावर देशाने वाटचाल केलेली नसून, आपण समाजाच्या जडणघडणीत भरकटलो आहोत,’ अशी खंत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी मंगळवारी व्यक्त केली. ‘राज्यघटनाच एकमेव धर्म समजून भारतीयांसाठी पोषक वातावरण निर्माण केल्यास देशाची झपाट्याने प्रगती होईल,’ असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

साने गुरुजी यांच्या ७५ व्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्र सेवा दलातर्फे डाॅ. काकोडकर यांच्या हस्ते ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षी, ज्येष्ठ लेखक डॉ. रावसाहेब कसबे, इस्लाम व सुफी तत्त्वज्ञानाचे अभ्यासक प्रा. डॉ. अलीम वकील, सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, ‘ऑल इंडिया ओबीसी मुस्लिम महासंघा’चे अध्यक्ष शब्बीर अन्सारी, कार्यकर्त्या पौर्णिमा मेहेर यांना साने गुरुजी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे, राजा कांदळकर आदी उपस्थित होते.

‘समाजातील तळागाळातील व्यक्तींच्या गरजांची पूर्तता करणे, हा खरा आर्थिक विकास असून, तो साध्य करता आला पाहिजे. प्रगतीसाठी कोणत्या मार्गाने पुढे गेले पाहिजे, याबाबत संभ्रम दिसून येतो. त्यामुळे केवळ विचारधारा म्हणजे विकास नव्हे. प्रत्येकांचे वेगवेगळे विचार असू शकतात आणि हेच प्रगल्भ समाजाचे लक्षण आहे,’ असे मतही डाॅ. काकोडकर यांनी नोंदवले.

‘पंतप्रधान मोदींमुळे लढायचे ठरवले’

‘व्यक्तीच्या संवेदना जागृत असल्याशिवाय तो समाजवादी होत नाही. त्यामुळे मी समाजवादी चळवळीतून वयाच्या ८० व्या वर्षी निवृत्त व्हायचे ठरविले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे मी लढायचे ठरविले आहे,’ असे डॉ. कुमार सप्तर्षी यांनी सांगितले.

‘ध्येयवादी विचारांची पोकळी’

‘सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली, तर कोट्यवधी रुपये देऊन आमदारांची खरेदी करून सरकार पाडले जाते. त्यावर मुख्यमंत्री स्वतःची पाठ थोपटून घेतात, तेव्हा बधीरता दिसते. समाजात ध्येयवादी विचारांची पोकळी जाणवते. सर्वसामान्य, गरिबांचे जीवनमान आणखी ढासळत चालले असून, नीतीमत्तेचा चुराडा झाला आहे,’ अशा शब्दांत डाॅ. बाबा आढाव यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.