डॉ. अरविंद परांजपे

डॉ. जयंत नारळीकर आणि माझा परिचय अगदी लहानपणापासूनचा. कारण, माझी आई आणि डॉ. मंगला नारळीकर या बहिणी. मी डॉ. नारळीकरांना लहानपणापासूनच भेटत होतो. मात्र, विज्ञान आणि त्यातील काम यानिमित्ताने आम्हा दोघांचा संबंध गहिरा झाला, तो १९९१ पासून. तेव्हापासून मी ‘आयुका’तील कामात प्रत्यक्ष सहभागी झालो. त्या आधी मी बेंगळुरूच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स’मध्ये होतो.

‘आयुका’ची सुरुवात झाली, तेव्हा नारळीकर सरांनी माझी हौशी आकाश निरीक्षकांना संपर्क साधण्याकरता नेमणूक केली होती. माझ्या कामातील मोठा भाग या निरीक्षकांना सुविधा पुरविण्याचा होता. त्यानंतर विज्ञान लोकप्रसाराची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आणि तेथून पुढे सलग २२ वर्षे मी ‘आयुका’त विज्ञान लोकप्रसाराचे काम केले.

मला आठवते, ‘आयुका’त दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान असायचे. एकदा नारळीकर सरांनी अमेरिकेतून आल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी ‘जेटलॅग’ असूनही हे व्याख्यान दिले होते. एकदा त्यांनी बांधीलकी दिली, की ते ती पूर्ण करत. विद्यार्थ्यांसाठी तर ते आवर्जून वेळ काढत असत.

एकदा पुण्याजवळच्या ग्रामीण भागात एका संस्थेसाठी त्यांनी व्याख्यान द्यायचे कबूल केले. खूप आधी हा कार्यक्रम ठरला. काही दिवसांनी नेमक्या याच दिवशी दिल्लीतील एका कार्यक्रमाचे त्यांना निमंत्रण आले. मात्र, सरांनी दिल्लीचा कार्यक्रम मोठा असूनही त्यासाठी आपला आधीचा कार्यक्रम रद्द न करता दिल्लीतील कार्यक्रमाला नकार दिला होता. सरांनी त्यांच्या डायरीत एकदा नोंद केली, की ते तो बदलत नसत.

विज्ञानप्रसाराचे काम करताना आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधन, संशोधक यांची माहितीही स्थानिकांना व्हावी, याकडेही नारळीकर सरांचे लक्ष असे. पुण्यात किंवा आसपास एखादा परदेशी खगोलशास्त्रज्ञ वा संशोधक आला, तर नारळीकर सर त्याला आवर्जून ‘आयुका’त बोलावत आणि हौशी आकाश निरीक्षकांना त्या व्याख्यानाला निमंत्रित करत. विद्यार्थी आणि संशोधक यांच्यात थेट संवाद व्हावा, यासाठीही नारळीकर सर प्रयत्नशील असत.

(लेखक मुंबईतील नेहरू तारांगणाचे संचालक आहेत.)