पुणे : शिक्षण विभागाकडून पवित्र संकेतस्थळामार्फत राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेतील दुसऱ्या टप्प्याची भरती राबवली जाणार आहे. त्यामुळे शिक्षक होण्याची आकांक्षा असलेल्या उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षेला प्रतिसाद दिला असून, राज्यभरातून साडेतीन लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी नोंदणी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात पहिली ते आठवीच्या वर्गांना शिक्षक होण्यासाठी टीईटी उत्तीर्ण अनिवार्य आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे १० नोव्हेंबर टीईटी आयोजित केली जाणार आहे. ९ ते ३० सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून अर्ज नोंदणीसाठी मुदत देण्यात आली होती. तर शुल्क भरण्यासाठी ४ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या मुदतीत एकूण ३ लाख ५५ हजार ९०५ उमेदवारांनी अर्ज भरला आहे. त्यातील १ लाख ५३ हजार ४१६ उमेदवारांनी पेपर एकसाठी, तर २ लाख २ हजार ४८९ उमेदवारांनी पेपर दोनसाठी नोंदणी केली आहे.

हे ही वाचा…महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा कधी सुटणार? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवार म्हणाले…

राज्यात २०२१नंतर टीईटी झालेली नाही. त्यामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर आता परीक्षा होत आहे. त्याशिवाय राज्यात पवित्र संकेतस्थळामार्फत राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेतील पहिल्या टप्प्याची भरती जवळपास अंतिम टप्प्यात आहे, तर दुसऱ्या टप्प्यात काही हजार पदे भरली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर टीईटीच्या नोंदणीला प्रतिसाद मिळाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Education department will implement second phase of teacher recruitment through official website pune print news ccp 14 sud 02