‘राज्यात प्रचारासाठी मोदींच्या पंधरा सभा होणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्तया खासदार मीनाक्षी लेखी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’तर्फे लेखी यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यामवेळी माजी खासदार प्रदीप रावत, उषा वाजपेयी आदी उपस्थित होते. या वेळी लोकसभेप्रमाणे या निवडणुकीतही राज्यात पक्षाला मते मिळतील, असा विश्वास व्यक्त करून लेखी म्हणाल्या, ‘राज्यात युती तुटली त्याचा फटका भाजपला बसणार नाही. राज्यात मोदींच्या पंधरा प्रचारसभा होणार असून त्याचे वेळापत्रक वेळोवेळी जाहीर केले जाईल. त्याचप्रमाणे भाजपच्या इतर राजकीय नेत्यांच्याही सभा होणार आहेत. गेल्या एकशे दहा दिवसांमध्ये जे काम मोदींच्या सरकारने केले, ते गेल्या दहा वर्षांत झाले असते, तर देशाचे चित्र वेगळे दिसले असते. युवकांना रोजगाराभिमुख करणे, उद्योगांची वाढ करणे यासाठी मोदी शासनाने पावले उचलली आहेत. उद्योगांच्या विकासासाठी ‘मेक इन इंडिया’चा प्रकल्प सुरू केला आहे. देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी मोदी शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.