नगरसेवक आणि मित्रपरिवारात कॅप्टन नावाने ओळखले जाणारे दत्ता धनकवडे यांची पुण्याच्या महापौरपदी सोमवारी बहुमताने निवड झाली आणि स्वाभाविकच कॅप्टन आता शहराचे नेतृत्व करा, अशी अपेक्षा महापालिकेत त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आली. गेली सतरा वर्षे राजकारणात असलेले दत्ता धनकवडे महापौर झाल्यामुळे धनकवडी-बालाजीनगर भागाला प्रथमच एवढे महत्त्वाचे पद मिळाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील सहाजण महापौरपदासाठी प्रबळ दावेदार ठरले होते. या सर्वामधून धनकवडे यांना संधी देण्यात आली आणि महापालिकेत गेली साडेसात वर्षे एकही पद न मिळालेल्या धनकवडे यांच्यावरील अन्यायही त्यामुळे दूर झाला. मितभाषी आणि सर्व पक्षातील नगरसेवकांबरोबर, नेत्यांबरोबर चांगले संबंध असलेला नगरसेवक अशी त्यांची ओळख आहे. धनकवडी भागातून ते महापालिकेत २००७ मध्ये पहिल्यांदा निवडून आले आणि त्यांनी त्यांच्या भागाचा सर्वागीण विकास करून दाखवला. त्याचीच पावती त्यांना पुन्हा २०१२ मध्ये निवडून देत मतदारांनी दिली.
धनकवडे यांनी यापूर्वी हवेली पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणूनही काम केले होते. कोणताही प्रश्न सोडवताना आधी त्याचा सर्वागानी अभ्यास करायचा, नंतर तो प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी उपाययोजना करायची आणि त्यासाठीची कार्यपद्धती योग्यरीत्या अमलात आणायची ही त्यांची कार्यपद्धती असल्यामुळे धनकवडीतील दीर्घकाळ रेंगाळेलेल रस्ते, पाणी आदी प्रश्न त्यांनी सोडवले आहेत. सातारा रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी आखलेला उड्डाणपूल आणि त्याचे सुरू झालेले काम याचेही श्रेय त्यांनाच दिले जाते. प्रभागातील विकासाची कामे योग्य पद्धतीने करताना तसेच नागरिकांचे प्रश्न सोडवताना धनकवडे यांनी राष्ट्रवादीचे संघटनात्मकही प्रभावीरीत्या उभे केले.
‘पुण्यासाठी चांगले काम करा’
महापौर म्हणून निवडून आल्यानंतर थोडय़ाच वेळात उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी धनकवडे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. पुण्यासाठी चांगले काम करा, असे अजितदादांनी सांगितल्याचे धनकवडे म्हणाले. महापौर म्हणून धनकवडे यांच्या उपस्थितीत झालेल्या पहिल्या अभिनंदन सभेतही अनेक सदस्यांनी त्यांच्या कॅप्टन मित्राला शुभेच्छा देत सर्व संघाला आता बरोबर घेऊन पुण्यासाठी काम करा, अशा शुभेच्छा दिल्या.
नगरसेवकांचा पाठिंबा
दत्ता धनकवडे यांनी महापौरपदासाठी पक्षाकडे इच्छा व्यक्त केल्यानंतर दक्षिण पुणे परिसरातील राष्ट्रवादीच्या नऊ नगरसेवकांनी त्यांना लेखी पाठिंबा देऊन तसे पत्र पक्षनेतृत्वाला दिले. यावेळचे महापौरपद खुल्या वर्गासाठी झालेले असतानाही नऊ नगरसेवकांनी धनकवडे यांना एकमुखी पाठिंबा दिला हे विशेष मानले जात आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Sep 2014 रोजी प्रकाशित
कॅप्टनकडे आले पुण्याचे नेतृत्व
नगरसेवक आणि मित्रपरिवारात कॅप्टन नावाने ओळखले जाणारे दत्ता धनकवडे यांची पुण्याच्या महापौरपदी सोमवारी बहुमताने निवड झाली.

First published on: 16-09-2014 at 03:25 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election mayor ncp datta dhankawade