Engineering student robbery in Budhwar Peth पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरात असणार्‍या एका सोन्याच्या दुकानातून दागिने चोरीची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातून अटक केली आहे. मुख्य म्हणजे आरोपी हा सराईत गुन्हेगार नाही, तर इंजिनीअरिंगचा टॉपर असल्याची माहिती समोर आली आहे. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

इंजिनीअरिंगच्या टॉपरकडून सोन्याच्या दुकानात चोरी

बाथरुमच्या खिडकीतून शिरून आरोपीने बुधवार पेठेत परिसरातील सोन्याचे दागिने चोरी केले. या आरोपीचे नाव लिखित जी असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार ६ जुलैच्या मध्यरात्री आरोपी बाथरूमच्या खिडकीतून दुकानाच्या आत शिरला आणि त्याने तब्बल ४ लाख ७४ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. दुकानदाराला दुसर्‍या दिवशी ही बाब लक्षात येताच त्यांनी पोलीस स्थानकात चोरीची तक्रार दाखल केली.

पोलीस पथकाने २५० सीसीटीव्ही तपासून आरोपीचा तपास सुरु केला आणि अखेर त्याला कर्नाटकमधून अटक करण्यात आली. आरोपी हा मुळचा कर्नाटकमधील कोलार जिल्ह्यातील जंगमगुर्जनहल्ली या गावातील रहिवासी असल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्याने आर्थिक अडचणीमुळे आणि बाईक घेण्यासाठी ही चोरी केली असल्याची बाब समोर आली आहे. चौकशीत त्याने चोरी केल्याचे कबूल केले आहे.

अलीकडे चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. सराईत गुन्हेगारच नव्हे तर आर्थिक अडचणीत असलेले शिक्षित तरुणदेखील आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी चोरीचा मार्ग अवलंबताना दिसत आहेत. गर्लफ्रेंडच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी, स्वतःच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी चोरी केल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. बुधवार पेठेतील ज्वेलरीच्या दुकानात चोरी करणारा तरुण अभियांत्रिकीचा टॉपर विद्यार्थी असल्याचे तपासात समोर येताच या घटनेची चर्चा होत आहे.

अलीकडेच पुण्यातील बुधवार पेठेत आणखी एक घटना घडली होती. वेश्यागमनासाठी जाणाऱ्या व्यक्तींचे व्हिडीओ चित्रित करुन त्यांना ब्लॅकमेल करुन त्यांच्याकडून पैसे उकळले जात होते. एका आयटी इंजिनिअरचीही काही लोकांनी अशाचप्रकारे फसवणूक करून त्याच्याकडून २० हजार रुपयांची मागणी केली. मात्र, पोलिसांनी यासंबंधित कारवाई करून दोन व्यक्तींना ताब्यात घेतले आहे.