पुणे : ‘छावा’ चित्रपटाच्या भरघोस यशानंतर देशभरातील वाचकांकडून होत असलेल्या मागणीमुळे तब्बल साडेचार दशकांनंतर ‘छावा’ कादंबरी इंग्रजी अनुवादाच्या माध्यमातून अमराठी वाचकांसाठी खुली झाली आहे. ‘छावा’चे लेखक शिवाजी सावंत यांची कन्या कादंबिनी धारप यांनी कादंबरीच्या इंग्रजी अनुवादाचे शिवधनुष्य पेलले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘छावा’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर या साहित्यकृतीच्या भाषांतरासाठी मागणी वाढली होती. प्रथमच इंग्रजी प्रकाशनांकडूनही एखाद्या मराठी कादंबरीसाठी इतकी उत्सुकता पाहायला मिळत होती. त्यामुळे वाचकांच्या मागणीला प्रतिसाद देत मेहता पब्लिशिंग हाऊसने ‘छावा’ कादंबरीचे इंग्रजी भाषांतर प्रकाशित केले आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा त गौरव करणारी शिवाजी सावंत लिखित ‘छावा’ कादंबरी मराठी साहित्याच्या प्रांतातील एक अजरामर साहित्यकृती ठरली आहे. या कादंबरीवर आधारित चित्रपट प्रदर्शित होताच त्याला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. गेली ४५ वर्षे मराठी वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही कादंबरी अमराठी वाचकांच्याही चर्चेचा विषय ठरली. १९७९ मध्ये ही कादंबरी प्रथम प्रकाशित झाली. अल्पावधीतच या कादंबरीचा लौकीक इतका वाढला की आजवर या कादंबरीच्या २४ आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. ‘छावा’च्या यशानंतर देशातील कानाकोप‌ऱ्यातून आणि अगदी जगभरातील वाचकांकडून या कादंबरीबद्दल विचारणा होऊ लागली. मेहता पब्लिशिंग हाऊसने यापूर्वीच या कादंबरीच्या इंग्रजी भाषांतराच्या कामास सुरुवात केल्याने चित्रपटाचा मुहूर्त साधत ‘छावा’ची इंग्रजी आवृत्ती बाजारात उपलब्ध करणे शक्य झाले असल्याचे मेहता पब्लिशिंग हाऊसचे व्यवस्थापकीय संचालक अखिल मेहता यांनी सांगितले.

शिवाजी सावंत यांच्या कन्या कादंबिनी धारप यांनी यापूर्वी सावंत यांच्या ‘युगंधर’ कादंबरीचा अनुवाद केला आहे. ते वाचकांच्या पसंतीस उतरल्यानंतर त्यांनी ‘छावा’ कादंबरीच्या अनुवादास सुरुवात केली होती. ‘कादंबरीतील अनेक प्रसंग वाचताना अंगावर शहारे येतात. त्यामुळे या कादंबरीचे भाषांतर करणे तितकेच भावनिक आणि आव्हानात्मकही होते’, असे कादंबिनी धारप यांनी सांगितले.

मागील महिन्याभरात कादंबरीची मागणी प्रचंड वाढल्यानंतर मेहता पब्लिशिंग हाऊसने या कादंबरीची पेपरबॅकमधील विशेष आवृत्तीही प्रकाशित केली आहे. याशिवाय हिंदी प्रकाशकांनीही विशेष आवृत्ती प्रकाशित केली आहे. त्यामुळे ‘छावा’ कादंबरी वाचकांना आता विविध भाषांमध्ये नव्या ढंगात अनुभवायला मिळणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: English translation of marathi novel chhaava by shivaji sawant on life of chhatrapati sambhaji maharaj soon pune print news vvk 10 asj