पवार नावाची कीड महाराष्ट्राला लागली आहे. ती मुळापासून काढून टाकावी लागेल, अशी जहरी टिका भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली होती. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी उत्तर दिलं आहे. अशातच आता एका माजी सैनिकाच्या मुलानेदेखील गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पडळकरांविरोधात पुण्यात बॅनरदेखील लावले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माजी सैनिक सूर्यकांत लालाजी पवार यांचे पूत्र माधव उर्फ नितीन सूर्यकांत यांनी पुण्यात बॅनर लावले आहेत. या बॅनरवरून त्यांनी पडळकरांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांना एक सवालदेखील केला आहे. या बॅनरवर लिहिलं आहे की, पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कीड? गोपीचंद पडळकरांचा निषेध. यावर पुढे लिहिलं आहे की, माजी सैनिक सूर्यकांत लालाजी पवार यांनी भारतीय सैन्यात देशसेवा केली. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात ते सहभागी झाले होते. देशासाठी प्राण हातावर घेऊन लढणारे आम्ही पवार महाराष्ट्राला लागलेली कीड? आमदार गोपीचंद पडळकर आम्ही पवार कुटुंबीय तुम्हाला कधीच माफ करू शकणार नाही.

हे ही वाचा >> “कुस्ती लढायची असेल, तर मर्दासारखं लढा, बावड्याचा पाटील कधी…”, सतेज पाटलांचं महाडिकांना आव्हान

अमोल मिटकरींचा पडळकरांना टोला

दरम्यान, पडळकरांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीदेखील उत्तर दिलं आहे. मिटकरी यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, हा गोप्या म्हणजे भट्टीच्या तव्यावर बसलेल्या बाबासारखा आहे. पवारांचं नुसतं नाव जरी ऐकलं की गोप्याच्या *** आग लागली म्हणून समजा. याला जास्त दिवस संन्यासी ठेवणे त्याच्या पक्षाला परवडणार नाही, हा त्याच्या पक्षाला एकदिवस आग लावून त्याच भट्टीवर ** शेकत आनंद घेईल.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ex soldiers son angry at gopichand padalkar remark on sharad pawar banner in pune asc