पुणे : राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित शाळांतील तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन चाचणी १ घेतली जाणार आहे. त्या अंतर्गत प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांची २२ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत ही परीक्षा होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एससीईआरटीचे सहसंचालक रमाकांत काठमोरे यांनी ही माहिती दिली. एससीईआरटीतर्फे पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ आणि संकलित मूल्यमापन चाचणी २ या नियकालिक चाचण्या घेतल्या जातात. त्यानुसार १० ते १२ जुलै दरम्या पायाभूत चाचणी घेण्यात आली. तर आता २२ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत संकलित मूल्यमापन चाचणी १ घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परीक्षेत लेखी आणि तोंडी चाचणीचा समावेश आहे. त्यात २२ ऑक्टोबरला प्रथम भाषा, २३ ऑक्टोबरला तृतीय भाषा (इंग्रजी), २४ ऑक्टोबरला गणित, २५ ऑक्टोबरला नववी गणित भाग २ असे परीक्षेचे वेळापत्रक आहे.

हेही वाचा >>> महाविद्यालयाच्या आवारात अत्याचार प्रकरणी संस्थाचालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी – MVA कडून आयुक्तालयासमोर आंदोलन

शालेय वेळापत्रकानुसार सकाळ, दुपार सत्रात शाळा स्तरावर परीक्षेच्या वेळेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येत आहे. मात्र, परीक्षा दिलेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षा घ्यावी, त्यात बदल करू नये. तोंडी, प्रात्यक्षिक, स्वाध्याय चाचणी लेखी परीक्षेनंतर त्या दिवशी वैयक्तिक स्वरुपात घ्यावी. विद्यार्थी संख्या जास्त असल्यास दुसऱ्या दिवशी उपलब्ध वेळेनुसार घ्यावी. तिसरी ते नववीसाठी भाषा, गणित, तृतीय भाषा (इंग्रजी) वगळून इतर सर्व विषयांची संकलित चाचणी १ लेखी, तोंडी, स्वाध्याय, प्रात्यक्षिक परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार घेण्याचे शाळा स्तरावरून नियोजन करावे. कोणत्याही शाळेत भाषा, गणित, तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांची दुबार संकलित चाचणी १ घेण्याची आवश्यकता नाही. 

हेही वाचा >>> कल्याणीनगर अपघात प्रकरणातील मुलाला दिल्लीतील शिक्षण संस्थेने प्रवेश नाकारला 

यंदा नववीचा समावेश गेल्या वर्षी पायाभूत चाचणी, संकलित चाचणी १, संकलित चाचणी २ या परीक्षा तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जात होत्या. दहावीला राज्य मंडळाची परीक्षा असते. त्यामुळे केवळ नववीच्याच वर्गाचे मूल्यमापन बाकी राहत होते. नववीच्या विद्यार्थ्यांचीही अध्ययन निष्पत्ती तपासण्यासाठी नववीचा समावेश करण्यात आला. त्यानुसार पायाभूत चाचणी घेण्यात आली. या चाचण्यांतील विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती पाहून विद्यार्थी कोणत्या विषयात मागे पडत आहेत हे शिक्षकांना समजून ते त्यावर उपचारात्मक काम करू शकतात, असे काठमोरे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Examination schedule for third to ninth students for the session 2024 in maharashtra pune print news ccp 14 zws