पुणे : ‘अनेक विषयांचे ज्ञान पुस्तकांच्या माध्यमातून मिळते. पुस्तके माणसाला समृद्ध बनवतात. तशीच पुस्तकांची दुकानेही आठवणी देऊन जातात. पुस्तकांची दुकाने बंद होणे अतिशय वाईट आहे,’ असे मत प्रसिद्ध अभिनेते-कवी किशोर कदम यांनी शनिवारी व्यक्त केले.

कृष्णा पब्लिकेशन्सतर्फे ‘पुस्तकांवरली पुस्तकं’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी कदम बोलत होते. ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. नितीन रिंढे, कवी गणेश विसपुते, साहित्यिक प्रवीण बांदेकर, भाषांतरकार अभिषेक धनगर परिसंवादात सहभागी झाले होते. याच कार्यक्रमात अभिषेक धनगर भाषांतरित ‘द हाउस ऑफ पेपर’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ज्येष्ठ संपादक करुणा गोखले, ‘एमकेसीएल’चे मार्गदर्शक डॉ. विवेक सावंत, ‘यशवंतराव चव्हाण सेंटर’चे मानद व्यवस्थापक दत्ता बाळसराफ, ‘सह्याद्री प्रतिष्ठान’चे अध्यक्ष अनिल पवार, प्रकाशक चेतन कोळी या वेळी उपस्थित होते.

कदम म्हणाले, ‘पुस्तकांची दुकाने वाचकाची अभिरुची घडवण्यासाठी फार महत्त्वाची असतात. चोखंदळ वाचकाला वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके उपलब्ध करून देण्यात त्यांचा वाटा असतो. वेगवेगळ्या विषयांवर उपलब्ध असणारी पुस्तके या दुकानांमध्ये असायला हवीत. आपल्यातल्या रसिकतेला दाद देणारी पुस्तकांसारखी माणसे आयुष्यात असणे गरजेचे असते. वाचकाची आवड जोपासण्यासाठी पुस्तके भेट देणारे मित्र असणे गरजेचे असते.’

‘चांगल्या पुस्तकांचा शोध घेणे, संग्रह करणे आणि वाचन करणे आयुष्य घडविते. कालांतराने पुस्तकांचा संग्रह वाढत जातो. काही पुस्तके संग्रहातून हरवतात. ती सापडत नाहीत. मित्रांच्या जशा आठवणी येतात, तशाच त्या पुस्तकांच्या आठवणी येऊ लागतात. तेव्हा त्याच पुस्तकाची दुसरी प्रत घ्यावी लागते. ती वाचायला घेतली, की जुनी प्रत सापडते. पुस्तकांचा संग्रह मात्र वाढलेला असतो,’ अशी टिपण्णी कदम यांनी केली.

विसपुते म्हणाले, ‘पुस्तकांचा संग्रह करण्याचे वेड असावे. जगभरातील अनेक चांगली पुस्तके शोधून त्याचा विविध भाषांत अनुवाद झाला, तर सर्व भाषकांना समृद्ध साहित्य वाचण्याची संधी मिळेल.’

‘पुस्तकांवर लिखाण करणे ही एक कला आहे. पुस्तके वाचली जातात की नाही, याची चिंता करण्यापेक्षा पुस्तकांच्या गर्दीत जगणे अतिशय सुंदर असते. पुस्तकांना केंद्रबिंदू मानून मराठीत पुस्तकांवरील पुस्तक येण्याची गरज आहे,’ असे मत रिंढे यांनी व्यक्त केले. ‘वाचन माणसाला माणूस बनवते. जीवनाला नवी दिशा देते. त्यामुळे पुस्तकांशी मैत्री करा,’ असे बांदेकर म्हणाले.

अक्षय शिंपी यांनी ‘द हाउस ऑफ पेपर’ या पुस्तकातील निवडक भागाचे अभिवाचन केले. चेतन कोळी यांनी प्रास्ताविक केले. मृदगंधा दीक्षित यांनी सूत्रसंचालन केले.

‘पुस्तक न वाचल्याची खंत नको’

‘वाचण्याच्या प्रामाणिक इच्छेतूनच प्रत्येक पुस्तक घेतले जाते. बऱ्याचदा ते वाचले जात नाही. कित्येकांच्या मनात हे शल्य असते. खऱ्या वाचकाच्या टेबलावरची पुस्तके सतत बदलत असतात. त्यातली काही चाळून झालेली असतात. तेवढ्यात दुसरे पुस्तक हातात पडते. वाचलेल्या पुस्तकांपेक्षा न वाचलेल्या पुस्तकांची संख्या आयुष्यात अधिक असते, असणार आहे. त्यामुळे भरपूर पुस्तके विकत घेऊन न वाचल्याची खंत मनात ठेवू नये,’ असे मत किशोर कदम यांनी व्यक्त केले.

वाचनाची चौकट सोडून मिळेल ते वाचत राहिलो. साचेबद्ध वाचन न केल्याने वेगवेगळी पुस्तके वाचता आली. कुणी सांगणारा भेटला नाही म्हणून वाचनात विविधता राहिली. वेगळ्या धाटणीची पुस्तके हाताळता आली. त्यामुळेच अनवट आणि वेगळी पुस्तके वाचू शकलो.- अभिषेक धनगर, भाषांतरकार