विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याबरोबरच रेल्वेकडून आता स्थानकाच्या आवारात अनधिकृतपणे वाहने लावणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. मागील महिन्याभरात याबाबत राबविलेल्या मोहिमेमध्ये सुमारे शंभर वाहनांवर कारवाई करून ३३ हजारांहून अधिक दंडाची वसुली करण्यात आली आहे.
रेल्वेकडून राबविल्या जाणाऱ्या मोहिमेमध्ये विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी, अनाधिकृत फेरीवाले, फलाटाचे किंवा प्रवासाचे तिकीट नसताना फलाटावर वावरणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कारवाई केली जाते. मात्र, डिसेंबर महिन्यापासून या कारवाईमध्ये अनधिकृत पार्किंगबाबतच्या कारवाईचाही समावेश करण्यात आला आहे. गाडय़ांची व प्रवाशांची वाढलेली संख्या लक्षात घेता स्थानकावर मोठा ताण येत आहे. स्थानकावरील अधिकृत पार्किंगच्या जागेवर वाहने न लावता स्थानकात येण्याच्या व बाहेर जाण्याच्या मार्गावर अनेकदा वाहने लावली जातात. त्यामुळे दोन्ही मार्गावर कधीकधी कोंडी निर्माण होते. ही बाब लक्षात घेऊन मागील महिन्यामध्ये स्थानकासमोरील रस्त्यांवर ‘नो पार्किंग झोन’ तयार करण्यात आला आहे. त्याबाबतचे फलकही लावण्यात आले आहेत. त्यानुसार वाहतूक पोलिसांप्रमाणे रेल्वेकडूनही पार्किंगबाबत कारवाई सुरू करण्यात आली आहे.
रेल्वे प्रशासन व रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने कारवाईची विशेष मोहीम राबविण्यात आली. पार्किंगबरोबरच विनातिकीट किंवा संबंधित श्रेणीतील योग्य तिकीट नसताना प्रवास करणाऱ्या ९०० जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दोन लाख ४९ हजार ८९८ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मोहिमेमध्ये २३ अनधिकृत विक्रेत्यांना पकडण्यात आले. त्यांना न्यायालयाकडून १३ हजार १०० रुपयांचा तर रेल्वेकडून सहा हजार २३५ रुपयांचा दंड आकारण्यात आला.
संग्रहित लेख, दिनांक 19th Jan 2014 रोजी प्रकाशित
रेल्वे स्थानकातील अनधिकृत पार्किंगवर दंडात्मक कारवाई सुरू
विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याबरोबरच रेल्वेकडून आता स्थानकाच्या आवारात अनधिकृतपणे वाहने लावणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे.
First published on: 19-01-2014 at 03:18 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fine for unauthorised parking in rly stn area