First case of Japanese encephalitis found in Pune | Loksatta

पुण्यात आढळला जपानी मेंदूज्वराचा पहिला रुग्ण; चार वर्षांच्या मुलाला संसर्ग

जपानी मेंदूज्वर हा विषाणूजन्य आजार असून तो क्युलेक्स विष्णोई जातीच्या डासामुळे पसरत असल्याचे समोर आले आहे.

पुण्यात आढळला जपानी मेंदूज्वराचा पहिला रुग्ण; चार वर्षांच्या मुलाला संसर्ग
पुण्यात आढळला जपानी मेंदूज्वराचा पहिला रुग्ण (संग्रहित छायाचित्र)

पुणे शहरामध्ये  जपानी मेंदूज्वराचा रुग्ण आढळून आल्यामुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा हादरुन गेली आहे. वडगाव शेरी परिसरातील एका चार वर्षाच्या मुलाला या आजाराची बाधा झाली असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुणे महापालिकेच्या क्षेत्रात प्रथमच या आजाराचा रुग्ण आढळला असल्याने त्याला रोखण्यासाठी महापलिकेकडून तयारी सुरु करण्यात आली आहे.

हेही वाचा- पुण्यात आढळला झिका विषाणूचा रुग्ण; ६७ वर्षीय व्यक्तीला बाधा

या चार वर्षाच्या मुलाला जॅपनीज एन्सेफलायटिस म्हणजेच जपानी मेंदूज्वर या विषाणूजन्य आजाराचे निदान झाले आहे. या मुलाला तीन नोव्हेंबर रोजी ससून रुग्णालयातील बालरुग्ण अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी डोकेदुखी, अशक्तपणा आणि फिट येणे ही लक्षणे दिसून येत होती. त्यानुसार रुग्णालयात विविध तपासण्या करून नियमित उपचारही सुरू ठेवण्यात आले. मुलाच्या रक्ताचे तसेच मणक्यातील पाण्याचे नमुने राष्ट्रीय विषाणू संस्थेत पाठवण्यात आले होते. या संस्थेने २९ नोव्हेंबर रोजी दिलेल्या अहवालामध्ये रुग्णाला जपानी मेंदूज्वर असल्याची माहिती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली आहे.

या मुलाला सलग नऊ दिवस कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले होते. त्यासोबत त्यास आवश्यक औषधेही चालू करण्यात आली. १७ दिवसांच्या अतिदक्षता विभागातील उपचारानंतर मुलाला सर्वसाधारण कक्षामध्ये हलवण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितले. हा आजार साधारणपणे १५ वर्षाखालील वयोगटातील मुलांमध्ये आढळून येतो.

हेही वाचा- पुणे: राजभवनासमोर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, स्वराज्य पक्षाची निदर्शने; पोलिसांकडून कार्यकर्ते ताब्यात

कशामुळे होतो जपानी मेंदूज्वर

क्युलेक्स विष्णोई जातीच्या डासामुळे जपानी मेदूज्वर होऊ शकतो. त्यामध्ये रुग्णाला ताप, डोकेदुखी, अशक्तपणा, फिट येणे अशी लक्षणे आढळून येतात. हा शहरातील पहिलाच रूग्ण असल्याने पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना सुरु केल्या आहेत. जपानी मेंदूज्वर हा विषाणूजन्य आजार असून तो क्युलेक्स विष्णोई जातीच्या डासामुळे पसरतो. पावसाळ्यात किवा पावसाळ्यानंतर या डासांचा प्रादुर्भाव वाढतो. पण, यापूर्वी हा डास पुण्यात आढळून आला नव्हता. त्यामुळे त्याचे रुग्णही सापडत नव्हते, असा दावा करण्यात आला आहे

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 18:08 IST
Next Story
पुणे: राजभवनासमोर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, स्वराज्य पक्षाची निदर्शने; पोलिसांकडून कार्यकर्ते ताब्यात