पर्यारणाच्या रक्षणाच्या दृष्टीने प्लास्टिकचे योग्य पद्धतीने विघटन करण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर पहिले ‘प्लास्टिक बॉटल क्रश’ यंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून स्थानकावर यंत्रांची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून सांगण्यात आले.
पुणे रेल्वे स्थानकावर स्वच्छतेच्या दृष्टीने मागील काही दिवसांपासून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. अस्वच्छता दाखवून देण्याबाबत प्रवाशांना आवाहनही करण्यात आले आहे. स्थानकाच्या आवारात प्रवासी पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या मोठय़ा प्रमाणावर घेऊन येत असतात. बाटलीतील पाणी संपल्यानंतर स्थानकाच्या आवारात कुठेही या बाटल्या टाकून दिल्या जातात. भुयारी गटार किंवा चेंबरमध्ये या बाटल्या अडकून राहिल्यास सांडपाण्याच्या निचऱ्यावर परिणाम होतो. पर्यावरणासही त्यामुळे हानी पोहचते.
प्लास्टिकच्या बाटल्यांचे योग्य पद्धतीने विघटन करण्यासाठी पुणे रेल्वेने पहिले ‘प्लास्टिक बॉटल क्रश’ यंत्र फलाट क्रमांक एकवर प्रतीक्षालयाजवळ बसविले आहे. महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते या सेवेला सुरुवात करण्यात आली. पुणे रेल्वेचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर, अपर व्यवस्थापक प्रफुल्ल चंद्रा, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील त्या वेळी उपस्थित होते. पाण्याच्या रिकाम्या बाटल्या प्रवाशांनी यंत्रात किंवा कचरा पेटीत टाकाव्यात, असे आवाहन रेल्वेने केले आहे. सध्या प्रायोगित तत्त्वावर एकच यंत्र बसविण्यात आले आहे. मात्र, प्रवाशांचा प्रतिसाद पाहून स्थानकावरील सर्वच फलाटांवर यंत्र बसविण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली.
