पिंपरी : महापालिकेच्या वतीने हाती घेतलेल्या डेअरी फार्म येथील उड्डाणपूल बांधण्याचे काम मुदत संपली, तरी अपूर्ण आहे. उड्डाणपूल खुला करण्यासाठी दिलेला मार्च आणि ऑगस्टचा मुहूर्त चुकला आहे. आता डिसेंबरअखेरपर्यंत काम पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असा दावा महापालिकेने केला आहे. रेल्वे प्रशासनाच्या विविध परवानग्यांमुळे विलंब होत असल्याचे कारण महापालिकेकडून देण्यात आले.

पिंपरी व परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी आणि वाहतूक कोंडी दूर करण्याच्या उद्देशाने हा पूल उभारण्यात येत आहे. या पुलाचा मार्च २०२३ मध्ये कार्यादेश देण्यात आला. मात्र, पुलाच्या जागेत अडथळा ठरणाऱ्या वृक्षांमुळे आणि रेल्वे विभागाशी संबंधित विविध परवानग्यांमुळे कामाला विलंब झाला. एप्रिल २०२३ मध्ये वृक्षतोड व पुनर्रोपणाचे प्रस्ताव महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे सादर करण्यात आला. त्याला ऑगस्ट २०२३ मध्ये मंजुरी मिळाली. त्यानंतर सप्टेंबर २०२३ मध्ये वन विभागाकडून मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर मार्च २०२४ मध्ये वृक्षतोडीस परवानगी मिळाली. मे २०२४ मध्ये एकूण १४२ वृक्ष काढण्यात आले, तर नोव्हेंबर २०२४ मध्ये ६४ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले.

पिंपरीतील हा पूल रेल्वे विभागाशी संलग्न असल्याने ओव्हर हेड इक्युपमेंट (ओएचई) व इतर संरचना बदलण्यासाठी मंजुरी आणि निधी हस्तांतरण प्रक्रियेतही वेळ गेला. रेल्वे विभागाने ७४.८९ लाखांची आगाऊ मागणी केली होती. ती रक्कम महापालिकेकडून देण्यात आली असून, आता आवश्यक मंजुरी मिळाल्याचे महापालिकेच्या प्रकल्प विभागाने सांगितले. डेअरी फार्म येथील उड्डाणपुलाचे काम जलदगतीने पूर्ण केले जाईल. पुलाच्या कामातील अडथळ्यांमुळे होणारा विलंब लक्षात घेता ठेकेदाराला मुदतवाढ दिली. केवळ रेल्वेच्या जागेतील काम बाकी असून ते रेल्वे प्रशासनाच्या नियंत्रणाखाली सुरू असल्याचे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.

पुलाचे काम डिसेंबरअखेर पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला केला जाईल. या प्रकल्पामुळे पिंपरीतील वाहतुकीची समस्या सुटेल. परिसरातील नागरिकांचा प्रवास सोयीचा होईल. रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपरी येथील नागरिकांना संत तुकाराम मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचणे सोपे होईल, असे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी म्हटले आहे.