पुणे : पर्यटकांच्या सुरक्षतितेच्या दृष्टिकोनातून वन विभाग आणि पर्यटनस्थळावरील स्थानिक अधिकारी संबंधित पर्यटन ठिकाणची प्रवेशसंख्या निश्चित करणार आहेत. तशी सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वन विभागाला केली आहे.
जिल्ह्यातील पर्यटनस्थळ असलेले गड किल्ले, धबधबे, धरणे अशा परिसरात जाणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डुडी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्या बैठकीत वन विभागाचे उप वनसंरक्षक महादेव मोहिते तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
कुंडमेळाच्या घटनेनंतर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच पर्यटन धोरण तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गड किल्ले, धबधबे, धरणे अशा ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेऊन या ठिकाणी एका वेळी किती पर्यटकांना प्रवेश द्यायचा, यासंदर्भात चर्चा झाली आहे. त्यानुसार प्रवेशसंख्या निश्चित करण्याची सूचना वन विभागाला दिली आहे. त्यानुसार विविध ठिकाणच्या पर्यटनस्थळांची स्थिती पाहून तेथील वन विभागाचे अधिकारी तेथील प्रवेश मर्यादा निश्चित करणार आहेत, असे डुडी यांनी सांगितले.
‘पर्यटनस्थळावर जाण्यासाठी ठराविक स्वरुपाचे प्रवेश शुल्कही निश्चित केले जाणार आहे. पर्यटकांनी किती अंतरापर्यंत जावे त्याचे क्षेत्र निश्चित केले जाईल. पर्यटकांना उभे राहण्यासाठी सुरक्षित जागा तयार केली जाईल. बॅरिकेट्स लावण्यात येईल,’ असेही डुडी यांनी स्पष्ट केले.
पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य म्हणून वन विभागाच्या सुरक्षा रक्षकांचा उपयोग केला जाणार आहे. मात्र, वन विभागाकडे सुरक्षा रक्षकांची संख्या कमी असल्याने काही स्थानिकांची पर्यटक मित्र म्हणून नियुक्ती करावी, असेही या बैठकीत निश्चित करण्यात आले असून पर्यटन प्रवेश शुल्कापोटी केलेल्या रकमेतून त्या पर्यटकमित्रांना मानधन दिले जाणार आहे.